कोटींची उधळपट्टी! उत्सव, महोत्सव, सेलिब्रिटीज आणून जनतेचा विकास ? उत्सव पुरे झाले, जनतेची कामे करावी.. पप्पू देशमुख





कोटींची उधळपट्टी! उत्सव, महोत्सव, सेलिब्रिटीज आणून जनतेचा विकास ?
उत्सव पुरे झाले, जनतेची कामे करावी.. पप्पू देशमुख

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे. करोडो रुपये खर्च करून उत्सव, महोत्सव सेलिब्रिटी आणण्याचा जणू जिल्ह्यात स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशा कार्यक्रमाने जनतेचा जिल्ह्याच्या, शहराच्या गावांचा विकास होतो का? अशा कार्यक्रमाने थोडा करमणूक आणि विरंगुळा होणे म्हणजे जनतेचा विकास नेते समजत असतील तर, निवडणुकीआधी जनतेला दिलेल्या वचननाम्याचे काय? याला विकास म्हणायचा का?
 प्रशासनावर वाढता ताण, पोलीस प्रशासनाची तारांबळ, जनतेच्या वाहतूकीचा खोळंबा. 
जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चपराशापर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी-कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून उत्सव व स्पर्धांचे आयोजन करण्यात गुंतले आहेत. उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही.परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले. यावर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज दि.1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले. 'उत्सव पुरे झाले आता जनतेची कामे करायला अधिक वेळ दिला पाहिजे', अशी भूमिका देशमुख यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेटून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ? देशमुख यांचा प्रशासनाला ईशारा

महानगरपालिकेने 7 वर्षात 250 कोटी रुपये खर्च करून चंद्रपूरकरांना अमृत योजनेचे पाणी बरोबर मिळत नाही, जागोजागी कचरा वाढला असून सांडपाणी वाहून देणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. मोठ्या प्रमाणात डासांची वाढ झाली.रस्त्याच्या मधे जागोजागी असलेल्या खड्ड्यांनी लोकांचे हाडे मोडकळीस आली.धुळीचे प्रदूषण,सरकारी दवाखान्याची दुरावस्था, रस्त्यावरील जीवघेणे अपघात,प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.जनतेच्या समस्या किंवा मागण्यांच्या बाबत राजकीय पक्ष,सामाजिक संघटना किंवा नागरिकांनी लेखी पत्र देऊन व वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या स्तरावर ठोस कार्यवाही होत नाही. एकीकडे जनतेच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असा ईशारा देशमुख यांनी या पत्रातून दिला आहे.
उत्सवाच्या आडून कोट्यावधीच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न ?
जनतेच्या मनोरंजनाच्या नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा व उत्सव यावर अनेक कोटी रूपयांची उधळपट्टी होऊन राहिली. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहेत. विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळायात धूळ फेकण्याचा,जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी करित आहेत, असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला.