ज्येष्ठांच्या अनुभवातून आलेले विचार सक्षम व प्रगत समाजनिर्मितीसाठी पोषक - आ. किशोर जोरगेवार
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेष्ठांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधार्यांच्या कर्तुत्वाला संबोधित करण्यासाठी जागतीक ज्येष्ठ नागरिक दिन हा दिवस साजरा केला जातो. जेष्ठांच्या विचारांची समाजाला गरज आहे. जेष्ठांच्या अनुभवातून आलेले विचार सक्षम, सुसंस्कृत आणि प्रगत समाज निर्मितीसाठी पोषक आहेत असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने रामनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तथा जागतीक ज्येष्ठ नागरिक दिन व वयाचे 75 वर्ष वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवराव पिंपळकर, गोपाळराव सातपूते, केशवराव जेनेकर, आसेगावकर, वसंतराव मुसळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ गौरकार, सचिव माणिकराव गोहोकार, सहसचिव लक्ष्मणराव धोबे, कोषाध्यक्ष वसंतराव आवारी, परशुराम कापतडे, डॉ. चंपतराव नांदे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात जेष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही. जेष्ठांचे विचार आणि सूचना या अमुल्य असून त्या विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, समाजानेही त्यांना योग्य वागणून दिली पाहिजे त्यांच्या सूचनांची दखल घेतली पाहिजे. आपआपल्या क्षेत्रात कामाच्या व्यस्ततेत जगत असतांना आतील कलागुण लुप्त होतात. मात्र निवृत्ती नंतर दळलेल्या कलागुणांना पून्हा पुनर्जीवित करण्याचे काम जेष्ठ नागरिक संघ करत आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने चांगल्या समाज निर्मितीच्या दिशेने कौतुकास्पद काम केल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिक संघ निवृत्ती नंतर ज्येष्ठांसाठीचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे ते यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांना एकत्रीत आणून त्यांचे विचार, अनुभव समाजापर्यंत पोहचविण्याचे काम केल्या जात आहे. ज्येष्ठांकडे विचारांची मोठी ठेवी आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी मांडलेले समाजोपयोगी विचार समाजानेही स्वीकारले पाहिजे. आज 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार केल्या जात आहे. हा सत्कार आपण विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची पावती असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 75 वर्ष पुर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.