चंद्रपूरच्या विकासकामासाठी कार्यान्वयन यंत्रणेने लक्ष द्या !
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
दिनचर्या न्युज :-
नागपूर/ चंद्रपूर, दि. १* : चंद्रपूर शहरालगतच्या 'नवीन चंद्रपूर' या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. सर्व सोयीसुविधायुक्त एक आदर्श शहर कसे उभे करता येईल, याकडे जिल्हा प्रशासन व विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिले.
नवीन चंद्रपूर भागात जिल्हा प्रशासन तसेच म्हाडातर्फे करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्यांच्या अध्यक्षतेत सेमिनरी हिल्स येथील हरीसिंग नाईक सभागृहात या आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, म्हाडाचे मुख्य अधिकारी महेशकुमार मेघपाळे, मुख्य अभियंता शिवकुमार आडे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीन चंद्रपूर भागात होणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी. दरमहा या समितीने विकासकामांचा आढावा घ्यावा. चंद्रपूर शहरालगत असलेल्या या भागात एक चांगल्या दर्जाचे सांस्कृतिक सभागृह, ॲम्फीथिएटर, ई-लायब्ररीचे (अभ्यासिका) नियोजन करीत आराखडा तयार करण्यात यावा. भूसंपादनाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी. चंदीगढसारखे एक सुनियोजित व चांगल्या दर्जाचे शहर कसे उभे करता येईल, याकडे कार्यान्वयन यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
*‘म्हाडा’ने पाणी कर कमी करावा*
महानगरपालिकेच्या तुलनेत म्हाडातर्फे आकारण्यात येणारा पाणी कर हा जास्त आहे. दरमहा 400 रुपये पाणीकर हा म्हाडातर्फे आकारण्यात येतो. वर्षाला हा कर 4800 रुपयांपर्यंत जातो. महानगरपालिकेच्या तुलनेत हा कर जास्त आहे. त्यामुळे म्हाडाने पाणी कर कमी करावा, अशी सुचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हाडा अधिका-यांना बैठकीदरम्यान केली.
*म्हाडातर्फे प्रेझेंटेशन*
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हे नवीन चंद्रपूरसाठीचे विशेष नियोजन प्राधिकरण आहे. म्हाडातर्फे यावेळी या भागात सुरू असलेली विविध प्रकारची कामे व नियोजन याविषयीचे सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर करण्यात आले. यातून विकासकामांची स्थिती आणि प्रगती दोन्हींची माहिती देण्यात आली.