अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन दक्ष




अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन दक्ष

जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर,दि.20 : जिल्ह्यात अंमली पदार्थाची लागवड, वाहतूक, साठवणूक व विक्री आदींच्या प्रतिबंधासाठी पोलिस विभाग व जिल्हा प्रशासन दक्ष असून याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, केंद्रीय वस्तु व सेवाकर विभागाचे अविनाशकुमार, टपाल कार्यालयाचे सहायक अधीक्षक अभिनव सिन्हा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थेमध्ये अंमली पदार्थाचे सेवन होणार नाही, याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे. तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत शाळांमध्ये जनजागृतीपर विविध उपक्रम राबवावे. त्याचा मासिक अहवाल सादर करावा. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे. तसेच जे कारखाने बंद आहेत, त्यावर विशेष लक्ष देणे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्सला अचानक भेटी देऊन सीसीटीव्हीची तपासणी, ड्रग्ज विक्रीचा अहवाल तपासणे. जिल्ह्यात खसखस किंव गांजा पिकाची लागवड होणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घेणे. ग्रामीण भागातील कृषी सहाय्यक व कर्मचा-यांकडून याबाबत माहिती घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

पुढे ते म्हणाले, टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आढळून आल्यास याबाबत तात्काळ पोलिस विभागाला माहिती द्यावी. अंमली पदार्थ बाळगणे / विक्री करणा-या इसमाबाबतची माहिती संकलित करून योग्य कारवाई करावी. पोलिस विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-यांविरुध्द कडक कारवाई करावी. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यान्वये दाखल केसेसच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी पोलिस स्टेशनचा आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.