सरडपार गाव लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणाने वेशीवर!
गावच झाले नकाशावरूनच गायब, गावातील लोकांची ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (चिमूर)
चिमूर तालुक्यातील सरडपार हे गाव , या गावाची लोकसंख्या जेमतेम 700 च्या जवळपास या गावाला पूर्वी 1962 मध्ये सोनेगाव, सिरस, काग, अशा गावांना जोडून सरडपार गट ग्रामपंचायत मध्ये होते. मात्र 2015 मध्ये चिमूर नगरपरिषद म्हणून घोषित झाली आणि येथील काही गावे चिमूर नगरपरिषद ला जोडली गेली. गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे या गावाला ना ग्रामपंचायतला जोडले, ना नगरपरिषद जोडल्या गेले . चक्क जिल्ह्याच्या नकाशावरूनच सरडपाला गायब केले.
लहानपणापासून पूर्ण जीवन या गावात समर्पित केलेल्या नागरिकांचे, या मातीशी, धुळीत समरस झालेल्या गावकऱ्यांना मात्र नकाशावरून गांवच गायब झाल्याने शासनाने ,प्रशासनाने ,लोकप्रतिनिधीने चक्क वेशीवर टाकले गेले. अशी भावना या गावकऱ्यांनी व्यतीत केली आहे.
संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासूनही वंचित असणारी भावना विचलित करणारी आहे. गावासाठी आपल्या हक्कासाठी आता गाव एकवटला आहे. अनेक वर्षापासून आपल्या हक्कासाठी पाठपुरावा केले. परंतु ना सरकारने दखल घेतली, ना प्रशासनाने , ना लोकप्रतिनिधीने गांभीर्याने घेतले नाही. समस्या फार मोठी नाही पण येथील लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणाने, लोकप्रतिनिधीची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा हे गाव ना ग्रामपंचायत मध्ये आहे. ना नगरपंचायत मध्ये आहे. कुठल्याही निवडणुकीस या गावातील नागरिकांना मतदानाचा करण्याचा अधिकार मिळत नाही. भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी सुद्धा ही देशाची शोकांतिका आहे.
गावच नकाशावर नसल्याने 2015 पासून कुठल्याही ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट नसल्याने या गावातील नागरिकांना शासकीय योजनेचा कुठलाही फायदा मिळत नाही. या सर्व बाबीची माहिती आमदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, शासनाला याची माहिती अनेकदा मेल करून कळवली असताना सुद्धा कार्यालय उपलब्ध झाले नाही. या गावाला ग्रामपंचायत चा दर्जा मिळावा अशी मागणी गावकऱ्यांची होत आहे.
येथील शाळकरी मुलांना शैक्षणिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. गावात बस सुविधा नसल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ना रस्ता ना जाण्याचे साधन . गाव ऑनलाईन नसल्यामुळे मुलांना शैक्षणिक दृष्ट्या लागणारे कागदपत्रे ऑनलाइन मिळण्यास त्रास होत आहे. या त्रासापमुळे गावातील अनेक नागरिकांनी गाव सोडल्याचेही बोलले जात आहे. आतापर्यंत या गावातील नागरिकांनी शेकडो निवेदन दिले पण अद्यापही गांभीर्याने या जठील समस्याकडे कुणीही बघितले नाही. अशी दुःखद भावना गावातील नागरिकांनी व्यतीत केली आहे.