शरद पवार सहकार मंत्रालयास मार्गदर्शन करणार



शरद पवार सहकार मंत्रालयास मार्गदर्शन करणार

दिनचर्या न्युज :-

नवी दिल्ली : देशाचे सहकारविषयक धोरण आणि निर्णय घेण्यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयास मार्गदर्शन करणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या विनंतीवरून सूचना आणि मार्गदर्शन करण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शविली आहे. सहकार मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती शरद पवार यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक पेजवरून दिली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची आणि सहकार मंत्रालयाचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना देण्याची विनंती मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना या वेळी केली.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राशी शरद पवार यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे सहकार मंत्रालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात ज्ञानेशकुमार, सहसचिव पंकज कुमार बन्सल, उपसंचालक श्रीमती सुचेता, मुख्य संचालक ललित गोयल यांचा समावेश होता. शरद पवार यांचा सहकार क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मंत्रालयाच्या कामकाजात होण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून कालची भेट असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीचे सर्वस्तरातून स्वागत होत असून शरद पवार यांच्या सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा सहकार मंत्रालयाला निश्‍चित फायदा होईल अशी प्रतिक्रिया उमटत आहेत. फेसबुक पेजवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. त्यातील काही प्रतिक्रिया...

शेती आणि सहकार या क्षेत्राचं शरद पवार यांच्याइतकं सूक्ष्म निरीक्षण कोणाचंही नाही. शरद पवार यांचा सल्ला आणि मार्गदर्शन निश्चितच फलदायी ठरेल.

- जगदीश कदम

देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्व आता केंद्र सरकारला कळून चुकले आहे. शरद पवार यांना सहकार क्षेत्राचा अनुभव आहे.

- सुनील शिंदे

सहकार खात्याला योग्य न्याय मिळेल. शरद पवार यांच्या अनुभवातून या खात्याला योग्य मार्गदर्शन मिळेल.

- बिपिन पगार

अभिनंदन सर, सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे.पण सध्या राजकारणात ढवळाढवळ वाढली आहे. कर्नाटकात के.एच.पाटील यांनी सहकारात मोठे योगदान दिले. सहकारी साखर आणि डेअरी क्षेत्रात आपले योगदान खूप आहे.

- रमेश लोहार

सहकार क्षेत्र महाराष्ट्रात विकसित करण्याचे यशस्वी काम शरद पवार यांनी केले आणि हे सर्व देशाने पाहिले आहे. पॉवर ऑफ महाराष्ट्र.