येत्‍या अधिवेशनात डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधणार – आ. सुधीर मुनगंटीवार.





येत्‍या अधिवेशनात डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधणार – आ. सुधीर मुनगंटीवार

डॉक्‍टरांनी विविध संशोधनांवर भर द्यावा.

*अमरावतीच्‍या असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स चा पदग्रहण सोहळा संपन्‍न.*

दिनचर्या न्युज :-
अमरावती :-
वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेले ‘ माणूस द्या, मज माणूस द्या’ या वचनाचा प्रत्‍यय आज या पदग्रहण समारंभानिमीत्‍त मला आला. आज या सोहळयासाठी माता महाकालीच्‍या भुमीतून अंबामातेच्‍या भूमीत मी आलो आहे. ही भूमी वैराग्‍यमुर्ती गाडगेबाबांची आहे. भगवान श्रीकृष्‍णाची सासुरवाडी आहे. मोठा आध्‍यात्‍मीक व पौराणिक वारसा या भूमीला लाभला आहे. ज्‍याप्रमाणे मी पुस्‍तक वाचतो त्‍याचप्रमाणे चेहरे सुध्‍दा वाचतो. समाजाप्रती असलेले आपले ऋण फेडावे यासाठी वैद्यक क्षेत्रात कार्य करणा-या या सर्व डॉक्‍टर्सच्‍या चेह-यावर सेवाभाव मी बघितला आहे. स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्‍टर्संने विविध शोध लावले हे कौतुकास्‍पद आहे. या जिल्‍हयात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय उपलब्‍ध व्‍हावे या आपल्‍या इच्‍छापुर्तीसाठी मी निश्‍चीतपणे प्रयत्‍न करेन. येत्‍या विधानसभा अधिवेशनात डॉक्‍टर्सच्‍या विविध समस्‍यांकडे सरकारचे लक्ष वेधण्‍याचा मी निश्‍चीतपणे प्रयत्‍न करेन. हॅप्‍पीनेस इंडेक्‍स वाढवायचा असेल तर हेल्‍थ ईज वेल्‍थ या संकल्‍पनेला प्राधान्‍य देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १९ जून २०२२ रोजी असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स ऑफ अमरावती यांच्‍या पदग्रहण समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. नवनविन पध्‍दतीचे संशोधन करण्‍याची आज नितांत गरज आहे. कोरोना काळात आम्‍ही यासंबंधी मुख्‍यमंत्र्यांना सातत्‍याने अवगत केले मात्र यासंदर्भात शासनस्‍तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वैद्यक क्षेत्रातील मान्‍यवरांनी संशोधनावर भर देण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स ऑफ अमरावतीचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष डॉ. अविनाश चौधरी, सचिव डॉ. तृप्‍ती जवादे, जसलोक हॉस्‍पीटल मुंबईचे डॉ. रूषी देशपांडे, एम.जी.एम. हॉस्‍पीटल औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे, इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय नागपूरचे माजी अधिव्‍याख्‍याता डॉ. एस.डी. सुर्यवंशी, डॉ. विजय बक्‍तार, डॉ. धवल तेली, भाजपाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष किरण पातुरकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्‍यक्ष डॉ. अविनाश चौधरी म्‍हणाले, या पदग्रहण समारंभाला आ. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती लाभणे हा आमचा बहुमान आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्‍यांच्‍या पुढाकाराने आरोग्‍य क्षेत्रासाठी अनेक महत्‍वपूर्ण निर्णय त्‍यांच्‍या मंत्रीपदाच्‍या काळात घेण्‍यात आले आहे. त्‍यांचे मार्गदर्शन आम्‍हाला नेहमीच लाभले आहे. भविष्‍यातही त्‍यांच्‍या मार्गदर्शनाचा लाभ असाच लाभेल असा विश्‍वास डॉ. अविनाश चौधरी यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. या पदग्रहण समारंभाला अमरावती येथील फिजिशियन्‍स तसेच गणमान्‍य नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

दिनचर्या न्युज :-