चंद्रपूर पं. स. च्या मासिक सभेवर बहिष्कार ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला सुरुवात!


चंद्रपूर पं. स. च्या मासिक सभेवर बहिष्कारग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला सुरुवात!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने असहकार आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने बुधवारपासून ५७८ ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, चंद्रपूर पंचायत समितीच्या गुरुवारी आयोजित केलेल्या मासिक सभेवरही ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकून आंदोलन उग्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामसेवकांच्या समस्यांसंदर्भात गेल्या काही महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २६ निवेदने दिल्यानंतरही युनियनला चर्चेसाठी बोलाविण्यात आले नाही. यावरून सीईओ ग्रामसेवकांना तुच्छतेची वागणूक देत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी युनियनच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यामुळे 3 मार्चपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही जिल्हा
परिषद प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने हे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेचे पंचायत समिती चंद्रपूर अध्यक्ष सुधाकर वासेकर यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन महिनाभर सुरू राहणार असून, त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान, गावातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम आहे.

केले जात आहे. मात्र, प्रशासकीय कामकाज बंद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे ऐन मार्च महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले असून, संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे. दरम्यान, चंद्रपुर येथे ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, गुरुवारपासून आयोजित केलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला याबाबतचे निवेदन चंद्रपूर समिती गट विकास अधिकारी यांना देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष सुधाकर वासेकर, यांच्यासह पंचायत समिती चंद्रपूर ग्रामसेवकांचा समावेश होता.





दिनचर्या न्युज