नागरिकांच्या सेवेसाठी ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित






नागरिकांच्या सेवेसाठी ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित

Ø 07172272555 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 3 मार्च : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात 15 तालुके येत असून मुख्यालयापासून इतर तालुक्यांचे अंतर लक्षात घेता वाहनधारकांना विविध कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित केला आहे.

परिवहन विभागाच्या सेवा जसे लायसन्स, वाहनांचा कर भरणे, वाहन हस्तांतरण करणे, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण करणे, परवाना इत्यादी कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचे अतंर लक्षात घेता प्रत्येक वेळी वाहनधारकास कार्यालयातील कामासाठी किंवा अनुषंगीक माहितीसाठी / अडचणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन परिवहन विभागाने 07172272555 हा क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जनतेची वेळेची बचत होणार असून मध्यस्थाद्वारे होणारी फसवणूक टाळता येणे शक्य आहे.

*व्हॉट्सॲप क्रमांकावर पुरविण्यात येणारी माहिती :* परिवहन विभागाच्या संबंधित कामाकाजाचे ऑनलाईन अर्ज करतांना प्रत्येक कामाचे फ्लो – चार्ट पुरविण्यात येतील. कार्यालयात येण्यापूर्वी कार्यालयीन कामाकाजासाठी आवश्यक प्रत्येक दस्ताऐवज माहिती व्हॉट्सॲपद्वारे प्राप्त होईल. वाहनधारकांना पडणा-या सामान्य प्रश्नांची उत्तरे तसेच ऑनलाईन अर्ज भरतांना तांत्रिक अडचणीबाबत माहिती उपलब्ध होईल. थकीत वाहन कर व पर्यावरण कर धारकांना मागणी पत्र या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे पाठविण्यात येणार असून थकीत कर वसुलीसाठी कार्यालयीन क्रमांक उपयोगात आणता येणार आहे.

जिल्ह्यातील वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या ‘हॅलो आरटीओ’ या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.