चंद्रपूर जिल्‍हयातील गुन्‍हयांसंदर्भात दोषीसिध्‍दीचे प्रमाण वाढवावे – आ. सुधीर मुनगंटीवार






चंद्रपूर जिल्‍हयातील गुन्‍हयांसंदर्भात दोषीसिध्‍दीचे प्रमाण वाढवावे – आ. सुधीर मुनगंटीवार

गुन्‍हेगारीच्‍या वाढत्‍या घटनांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आढावा बैठक.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर जिल्‍हयात खुन, दरोडे, बलात्‍कार, खंडणी असे गुन्‍हेगारीचे प्रकार मोठया प्रमाणावर वाढले आहे. जिल्‍हयात मा‍फीयाराज निर्माण झाले
असून गॅंगवारच्‍या दिशेने जिल्‍हयाची वाटचाल सुरू आहे. गुन्‍हयांसंदर्भात दोषसिध्‍दी वाढवावी आणि गुन्‍हेगारीच्‍या वाढत्‍या घटनांवर आळा
घालण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दिनांक २६ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील गुन्‍हेगारीच्‍या घटनांवर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याबाबत आढावा बैठक मंत्रालय मुंबई येथे बोलाविली. या बैठकीला अपर मुख्‍य सचिव गृह श्री. मनुकुमार श्रीवास्‍तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजयकुमार गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्‍सेना, महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव महेश वरूडकर, जहांगीर खान आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्‍हयातील वाढत्‍या गुन्‍हेगारीच्‍या घटनांवर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाहीची हमी पोलिस महासंचालकांनी यावेळी दिली. येत्‍या एक ते दोन महिन्‍यात या संदर्भातील फरक आपल्‍याला निश्‍चीतपणे जाणवेल असेही पोलिस महासंचालक म्‍हणाले. जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी परस्‍परांमध्‍ये समन्‍वय ठेवून प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करावी असे निर्देश अपर मुख्‍य सचिव गृह यांनी यावेळी दिले.
जिल्‍हयात मोठया प्रमाणाव महिलांवर अत्‍याचार होत असून अशा घटनांमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. बालीकांवर अत्‍याचार होत आहेत. अशा प्रकरणांमध्‍ये गुन्‍हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. या प्रकरणांमध्‍ये गांभीर्याने लक्ष देण्‍याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.