ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वाधीक रोजगार देणारे केंद्र ठरावे - आ. किशोर जोरगेवार
*ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन 2040 करण्यासाठी भागीदारांचे चर्चासत्र*
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील अनेक वर्षापासून आम्ही या भागाचे संरक्षण व संवर्धन केले आहे. त्यामूळे या भागाचा 20 वर्ष पर्यंतचा आराखडा तयार करत असतांना येथील स्थानिकांचाही विचार केला गेला पाहिजे. ताडोबा अभयारण्य हे रोजगार निर्मितीचे केंद्र आहे. त्यामूळे येथील कामात स्थानिकांना 80 टक्के रोजगार देत, येत्या 20 वर्षात हे व्याघ्र प्रकल्प सर्वाधीक रोजगार देणारे केंद्र ठरावे या दिशेने नियोजन करण्यात यावे असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाद्वारा आयोजीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन 2040 भागीदारांच्या चर्चासत्र कार्यक्रमात व्यक्त केले.
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन 2040 तयार करण्यासाठी वन विभागाच्या वतीने भागीदारांचे चर्चासत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. एच. काकोडरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, हुडा, जितेंद्र रामगावकर, गुरुप्रसाद आदि वन विभागाच्या अधिका-यांसह इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, संजय डीमोले, यांच्यासह सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या चर्चा सत्रात पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा तयार करत असतांना यात वन्यजीव, वन, रोजगार, विदेशी पर्यटन, स्थानिक, वनमजूर हे सर्व घटक महत्वाचे आहे. हे नियोजन करत असतांना याचाही सहभाग असला पाहिजे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे वन्यजीवांचा मुक्त संचाराला आळा बसतो किंबहुना वेळोवेळी वन्यजीव आणि मानव संघर्ष घडतांना दिसतो त्यामूळे येथे रोप-वे ची निर्मिती करता येईल का दिशेने विचार करण्यात यावा, वर्षातुन एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ताडोबा महोत्सवाचे आयोजन करुन ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरीता देश विदेशातील पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल या दिशेने प्रयत्न करण्यात यावे, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांची नेमणूक करून जनुकीय पोर्टेबल फील्ड लॅब विकसित करण्यात यावी, स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश आणि सफारी शुल्कात सवलत देण्यात यावी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मृत पावलेल्या वाघ व इतर प्राणी आणि पक्षी यांचे शरीर नष्ट न करता संरक्षित करून पुतळे तयार करून त्याचे संग्रहालय तयार करण्यात यावे, वन्यजीव अभ्यासकांचे चर्चासत्र व कार्यशाळा, वाघ आणि इतर प्राण्यांवर अभ्यास करणारे यांच्या करिता परिषद सभागृह व राहण्याकरिता वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी, वनक्षेत्रात वाढ करण्याकरिता गुणात्मक वृक्ष लागवड करण्यात यावी, सुरक्षा रक्षक व इतर मनुष्यबळ वाढविण्यात यावे, येथील सहा कोर क्षेत्र व 14 बफर क्षेत्र असे 20 प्रवेश गेट बोलके करुन गेटवर ताडोबाचे दर्शन घडेल असे सौंदर्यीकरण करण्यात यावे, काही वाघ हे सिएसटीपीएच्या परिसरात वास्तव्यास आहे, या वाघांचीही गणना करुन त्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. या चर्चासत्रात आलेल्या सुचनांनूसारच याचे नियोजन करण्यात यावे असा एखादी कायदा आणता येईल का या दिशेनेही वन विभागाने विचार करावा असेही ते यावेळी म्हणाले. सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वन्यप्रेमी आहे. याचा मोठा लाभ वनविभागाला होऊ शकते, असे ते यावेळी प्रसंगी बोलताना म्हणाले.