महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड अंतर्गत हॅकॉथॉनचे उद्घाटन थाटात

विकासासंबंधी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सरकार उपयोग करणार!
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही 
महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड अंतर्गत हॅकॉथॉनचे थाटात उद्‌घाटन
नागपूर/प्रतिनिधी : 
कोणत्याही शहराच्या विकासामध्ये अनेक समस्या अडसर ठरतात. या समस्यांपासून सुटका करण्यासाठी अनेक संकल्पनांची आवश्यकता असते. नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये सुलभता आणणाऱ्या अनेक संकल्पनांचा सरकारलाही स्वीकार करावा लागतो. ‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’च्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यामध्ये सहभागी होऊन आपले शहर, राज्य व देशाच्या विकासासंबंधी, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणणाऱ्या संकल्पना सादर करा. सरकारकडून या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘महापौर इनोव्हेशन अवार्ड’ अंतर्गत ‘हॅकॉथॉन’चे शुक्रवारी (ता.१) थाटात उद्‌घाटन झाले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह आमदार गिरीश व्यास, प्रा. जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, एआयसीटीई दिल्लीचे सल्लागार दिलीप मालखेडे, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक भगवान मेंढे, निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त नितीन कापडणीस, ‘महापौर इनोव्‍हेशन काउंसिल’चे समन्वयक डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील विविध भागातील तरुणांशी संवाद साधतात. या संवादातून अनेक तरुणांकडून येणाऱ्या संकल्पनांचा त्यांनी स्वीकार करून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करून घेतला आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमी तरुणांशी संवाद साधून त्यांच्या संकल्पनांचे सदैव स्वागत केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आज नागपूर शहरात सर्वत्र कोट्यवधींची विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांमध्ये भर घालण्यासाठी त्यांनीही नवसंकल्पनांना नेहमी प्रोत्साहन दिले आहे. या तिन्ही नेत्यांच्या कार्याला सहकार्य देत महापौर नंदा जिचकार यांनी सुरू केलेले ‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’ हा स्तुत्य उपक्रम असून यातून येणाऱ्या नवसंकल्पना देशाच्या विकासासाठी पथदर्शी ठरतील, असा विश्वासही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

आपले नागपूर शहर जागतिक दर्जाचे शहर बनविणारी सर्व विकास कामे आज आपल्या शहरात सुरू आहेत. मात्र ही कामे करताना यामध्ये येणारे अडथळे किंवा भविष्यात उद्‌भवणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपल्याकडे आतापासूनच उपाय असले तर ते फायद्याचे ठरतील. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अनेक नवनवीन संकल्पना असतात. त्या इतरांशी चर्चा करून पुढे येण्याची गरज आहे. अशा पुढे येणाऱ्या संकल्पनांमधूनच विकासातील अडथळ्यांवरील उपाय पुढे येतील. हे उपाय शासनापर्यंत पोहोचवा शासन त्याचा योग्य उपयोग करेल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 
नवसंकल्पनांचा स्वीकार करताना सवयी बदलणे आवश्यक : महापौर नंदा जिचकार

आकाशाला गवसणी घालण्याचे बळ तरुणांमध्ये आहे. देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या मनगटात आहे. ‘हॅकथॉन’ला मिळालेल्या तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अनेक नवसंकल्पना पुढे येणार आहेत. मात्र या नवसंकल्पनांचा स्वीकार करताना आपल्याला आपली मानसिकता व सवयी बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.आज आपले शहर कात टाकत आहे. शहरात सर्वत्र विकास कामांचा झंझावात सुरू आहे. अगदी कमी वेळातच शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. आपल्या शहराच्या विकासात भर घालताना तरुणांचा त्यात सहभाग असावा, त्यांच्या संकल्पनांद्वारे शहराच्या विकासात भर घातली जावी, या उद्देशाने ‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’ची संकल्पना पुढे आली. शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे दिग्गज नेते लाभले आहेत. आपल्या शहरासाठी आपण योगदान द्यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विकासात्मक ‘व्‍हिजन’ नेहमी प्रेरणा देणारे आहे, असे महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या.

एकीकडे शहरात विकासाचा वेग सुसाट असताना आपण आजही स्वच्छता, कचरा विलगीकरण, भितींवरील पिचकाऱ्यांमुळे त्रस्त आहोत. या समस्या सोडविणे लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जबाबदारी असली तरी ते नागरिकांचेही कर्तव्‍य आहे. नागपूर शहर दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी म्हणून निवड होऊनही कामाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर आहे. इनोव्‍हेशन ॲण्ड बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये आपल्या शहराने बाजी मारली. ही प्रत्येक नागपूरकरासाठी अभिमानास्पद बाब आहे. या सर्वांमध्येही प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. नवनवीन इनोव्‍हेशनमुळे आपल्या जीवनात दिवसेंदिवस सुलभता येत आहे. मात्र आपले घर, परिसर याप्रमाणेच शहर स्वच्छ असावे यासाठी स्वत:ही कर्तव्यदक्ष असणे आवश्यक आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

तरुणांसाठी उत्तम व्यासपीठ : नितीन गडकरी
केंद्राच्या अर्थसंकल्पामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नागपूर शहरात जगातील सर्व गोष्टी व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे. त्यांना इनोव्हेटिव्ह ॲप्रोच मिळावे यासाठी ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ हे उत्तम व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. नवनवीन योजना तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून तरुणाईसमोर व्यक्त केला.
प्रत्येकाच्या डोक्यातील नवसंकल्पनांना ‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’मुळे व्यासपीठ उपलब्ध: कुलगुरू डॉ. काणे
आज स्मार्ट या शब्दाने संपूर्ण जीवन व्यापले आहे. काळानुरूप या शब्दाची संकल्पना बदलत गेली. आज आपले शहर स्मार्ट करण्यासाठी सर्व स्तरातून कार्य सुरू आहे. या कार्याला बळ देण्यासाठी अशाच स्मार्ट ‘आयडिया‘ची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात ‘टेक्नॉलॉजी इनोव्‍हेटिव्‍ह’ करण्याचे बळ तरुणांमध्ये आहे. नवसंकल्पनात्मक तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहे. प्रत्येक तरुणांच्या डोक्यातील संकल्पनांना ‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’मुळे महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर व्हावा : डॉ. भूषणकुमार उपाध्याय
आज तंत्रज्ञानाने विकासाला मोठी गती मिळाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होऊ नये याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. जी गोष्ट चमत्काराने होऊ शकत नाही ती तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखविले. एकूणच तंत्रज्ञानाचे चमत्कार केले आहे. आज सायबर गुन्ह्यांमध्ये अनेक तरुण अडकले आहेत. त्यामुळे मात्र या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी केले.

‘इनोव्‍हेशन’मुळे युरोपियन देशांना मानसन्मान : दिलीप मालखेडे
कोणतेही संशोधन करण्यासाठी संशोधक असने आवश्यक आहे. मात्र नवसंकल्पनांसाठी संशोधक असावेच असे नाही. अशा नव संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात येतात. या नवसंकल्पनांना प्रत्यक्षात उतरवून कार्य करणारे यशस्वी ठरतात. उबेर, स्नॅपडील, फ्लीपकार्ट, मॅकडोनाल्ड अशा विविध कंपनी अशाच नवसंकल्पनांमधून पुढे आलेल्या आहेत. ‘इनोव्‍हेशन’मध्ये नेहमीच युरोपियन देश पुढे असल्याचे दिसून येते. इनोव्‍हेशनमुळे युरोपियन देशांना मानसन्मान मिळत असल्याचे मत एआयसीटी दिल्लीचे सल्लागार दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केले. प्रत्येक शहरात अनेक मोठ्या समस्या आहेत या समस्या सोडविण्यासाठी तरुणांनी आपल्या नवसंकल्पनांद्वारे उपाय मांडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

चार झोनमध्ये दोन हजारावर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
‘महापौर इनोव्हेशन अवार्ड’ अंतर्गत ‘हॅकॉथॉन’मध्ये नागपूरसह वर्धा, बल्लारपूर, औरंगाबाद येथील तरुणांनी सहभागी होउन आपल्या संकल्पनांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. ‘हॅकथॉन’मध्ये सहभागी झालेल्या तरुणांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली. नेमून दिलेल्या झोनमध्ये तरुणांनी आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण करून त्याबाबत तज्ज्ञांना माहिती दिली.

विविध विषयांवर व्याख्यान व गटचर्चा
‘महापौर इनोव्‍हेशन अवॉर्ड’ अंतर्गत ‘हॅकॉथॉन’मध्ये शुक्रवारी (ता.१) दिवसभर विविध विषयांवर व्याख्यान व गटचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘इनोव्‍हेशन थ्रू वर्डस्‌’ या विषयावर निखील चांदवानी, ‘क्रिएटीव्‍ह प्रॉब्लेम सॉल्व्हींग’ या विषयावर श्रीयश जिचकार, ‘इनोव्हेशन ॲण्ड स्टार्टअप’ विषयावर केतन मोहितकर, ‘सिलेक्टींग अ ब्लॉकबस्टर आयडिया फॉर करिअर’ विषयावर अथर्व मोरोणे, नोकरीच्या संधीवर आशिष खोले, सुमीत उरकुडकर, ‘फ्यूचर ऑफ इलेक्ट्रिकल व्हेईकल’ विषयावर अविनाश सिंग यांनी व्याख्यान दिले. याशिवाय शिक्षणातील नवसंकल्पना या विषयावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. कुमथेकर, प्रमोद पाम्पटवार, नॅशनल टेक्सटाईल असोसिएशनचे संचालक डॉ. हेमंत सोनारे व महापौर नंदा जिचकार यांची गटचर्चा आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शिक्षणातील नवसंकल्पनांबाबत मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन ‘महापौर इनोव्‍हेशन अवार्ड’चे सहसमन्वयक केतन मोहितकर यांनी केले. शेवटी महापौर नंदा जिचकार यांनी ‘हॅकथॉन’साठी विविध भागातून आलेल्या तरुणांनी दर्शविलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.