वीज केंद्रातील वातावरण स्वच्छ,सुंदर व हिरवेगार करणे हि प्रत्येकाची जबाबदारी:चंद्रकांत थोटवे

४४ व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता
वऱ्हाडी तडका ने पोटभर हसविले
गाणी, नृत्य, मिमिक्री विशेष आकर्षण   
नागपूर/प्रतिनिधी:

औष्णिक विद्युत केंद्र व परिसरातील वातावरण उत्तम ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दैनदिन जीवनावर दिसून येतो त्यामुळे वीज केंद्रातील अंतर्गत व बाह्य वातावरण सर्वोत्तम ठेण्यासाठी प्रत्येकाच्या पुढाकाराची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत थोटवे संचालक महानिर्मिती यांनी केले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या समारोपीय समारंभात ते मारोती मंदिर मैदान कोराडी येथे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, विशेष निमंत्रक म्हणून कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, राजू बुरडे, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, मुख्य अभियंते राजकुमार तासकर,अनंत देवतारे,राजेश पाटील, दिलीप धकाते, रमेश वैराळे(सचिव) प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले. 
प्रारंभी प्रास्ताविकातून राजकुमार तासकर यांनी वर्षभरातील महत्वपूर्ण कार्याचा मागोवा घेतला व ४४ व्या वर्धापन दिन आयोजनामागची भूमिका विषद केली तर वर्धापन दिन आयोजन समितीचे सचिव रमेश वैराळे यांनी अहवाल वाचन केले. ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व प्रधान सचिव ऊर्जा तथा प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती अरविंद सिंह यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. 
याप्रसंगी सुरक्षिततेवर आधारित “ऊर्जा सुरक्षा” या चित्रफितीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल धीरज मोरे(सर्पमित्र), पि.डी.नाईक(वाहनचालक), वसंत भगत(सामाजिक कार्य), तसेच विविध क्रीडास्पर्धांच्या सांघिक विजेत्या व उप विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी राजू बुरडे म्हणाले कि कोराडी वीज केंद्र हे महत्वाचे वीज केंद्र असल्याने महत्तम वीज निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. विनोद बोंदरे म्हणाले मागील दोन वर्षात महानिर्मितीने देश-विदेश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्याचा प्रत्यय वीज क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून आता होत असल्याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले. सुधीर पालीवाल म्हणाले कि, सत्तरच्या दशकातील तरुण अभियंत्यांना रोजगार व त्याकाळात नागपूर जिल्ह्यातील उद्योजकांना व्यापार-उदिमासाठी कोराडी वीज केंद्राचे मोठे योगदान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे यांनी सांगितले कि जगात ज्या-ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी करणे, रास्त दरात महत्तम वीज उत्पादनाचे ध्येय गाठणे हा संकल्प वर्धापन दिनाच्या निमित्ताने करायला हवा.
वर्धापन दिन समारोपीय समारंभाला उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, अरुण वाघमारे, सुनील सोनपेठकर, अधीक्षक अभियंते भगवंत भगत, डॉ. भूषण शिंदे,विराज चौधरी,जगदीश पवार,संजय रहाटे, शैलेन्द्र गर्जलवार, अशोक भगत, कन्हय्यालाल माटे, विजय बारंगे, अरुण पेटकर, नंदकिशोर पांडे उप महाव्यवस्थापक(मानव संसाधन), मुकेश मेश्राम उप औद्योगिक संबंध अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी-विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. 
समारंभाचे सूत्र संचालन नेहा फुके व पराग लांबे यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये वर्धापन दिन आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

वऱ्हाडी तडका :
वैदर्भीय भाषेतील व्यंगात्मक शैलीतील वऱ्हाडी तडका स्थानिक कलाकारांनी दमदार अभिनयासह सादर केला. यामध्ये कोराडी वीज केंद्र व परिसरातील दैनंदिन घडामोडी, बोली भाषा, कामकाजाच्या ठिकाणचे किस्से रसिकांच्या मनाला भावले व सलग २५ मिनिटे प्रेक्षकांना ह्या कलावंतांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसविले.