अधिष्ठाता कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपनाने निवासी डॉक्टर्स झाले रूग्ण, वस्तीगृह वा-यावर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
एमबीबीएस झालेले व सध्या चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमएस किंवा एमडी चे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टर्स पैकी पाच विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झालेली असून त्यापैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र ज्या वस्तीगृहामध्ये विद्यार्थी राहतात त्या वस्तीगृहाची अजूनपावेतो अधिष्ठाता कार्यालयातील किंवा जिल्हा प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने साधी पाहणी केली नाही.खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आजारी निवासी डॉक्टर्सची भेट घेण्याचे औचित्य सुध्दा कोणी दाखवले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसोबत आता शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांनाही वैद्यकीय महाविद्यालय व शासनाने वाऱ्यावर सोडले असा गंभीर आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
आज 1 ऑगस्ट रोजी देशमुख यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच डेंगूचे रुग्ण आढळलेल्या निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाची पाहणी केली. जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी पीडित विद्यार्थ्यांसोबत चर्चा सुद्धा केली.
शहराच्या कस्तुरबा रोडवरील जुबिली हायस्कूल समोरील मनपाच्या राजे धर्मराव शाळेच्या इमारतीमध्ये असलेल्या वसतीगृहात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 14 विद्यार्थी व 18 विद्यार्थींनी असे एकुण 32 निवासी डॉक्टर्स राहतात. यापैकी 5 विद्यार्थ्यांना एकाच वेळी डेंग्यूची लागण झाली.एका निवासी डॉक्टरची प्रकृती गंभीर असुन त्याला नागपूर येथिल शुअरटेक हाॅस्पीटलच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र अशा गंभीर परिस्थितीतही रुग्ण झालेल्या निवासी डॉक्टरांची अधिष्ठाता कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी साधी भेट घेतली नाही. वस्तीगृहाची पाहणी करण्यासाठी सुद्धा कोणी आले नाही.
या वस्तीगृहाची पाहणी केल्यानंतर चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय तसेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल उद्या दिनांक 2 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली.