जिल्हात वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब, आळा घाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आ. किशोर जोरगेवारांच्या सुचना!




जिल्हात वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब, आळा घाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आ. किशोर जोरगेवारांच्या सुचना!

जिल्ह्यात आणखी किती लोकांचा बळी जाऊ देणार पोलीस अधीक्षकांना आमदार किशोर जोरगेवार यांचा सवाल

*सतर्क राहत गुन्हेगारीवर आळा घाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुचना,*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पिस्तुल घेऊन गुन्हेगार सर्रास वावरत असेल तर ही बाब कायदा सुव्यवस्थेसाठी चिंतेची आहे. वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा गोळीबार केल्या जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित करत जिल्हात आणखी किती बळी जाऊ देणार आहात असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांना विचारला असुन रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर कार्यवाही करत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या सूचना केल्या आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक पंकज बनसोडे, पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करणसिंह बैस आदींची उपस्थिती होती.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांत शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके उचलले आहे. काही घटनांमध्ये पिस्तूलचा वापर करण्यात आला असून, ही गंभीर बाब आहे. पोलीस विभागाने सतर्क राहून, ही शस्त्रे चंद्रपूरात दाखल कशी होतात याची चौकशी करून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी गुन्हेगारीत लिप्त असलेल्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशा सूचना जोरगेवार यांनी केल्या आहेत.
बैठकीत मागील काही दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांची तपशीलवार चर्चा करण्यात आली. विशेषतः पिस्तूलचा वापर करून झालेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारच्या गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. शस्त्रे चंद्रपूरात कशी येतात, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. गुन्हेगारीत लिप्त असलेल्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही केली जावी. अशा गुन्हेगारांना तातडीने अटक करून न्यायालयात सादर करावे, मोठी घटना घडण्याआधीच गुप्तचर विभागा मार्फत त्याची माहिती पोलिस विभागाला मिळत असते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पून्हा सक्षम करावी, आलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता त्याची सत्यता तपासण्यात यावी अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
अवैध व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. गस्त वाढवणे, संदिग्ध व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्या आहे.