डॉ विश्वभर चौधरी व ऍड असीम सरोदे यांच्या निर्भय बनो" सभेत हजारो नागरिकांची उपस्थिती




डॉ विश्वभर चौधरी व ऍड असीम सरोदे यांच्या निर्भय बनो" सभेत हजारो नागरिकांची उपस्थिती


आम्ही निर्भय चंद्रपूरकर' बॅनर खाली विविध संस्था संघटना, पक्ष व नागरिक एकत्रित

आयोजनाच्या वेगळ्या व अनोख्या क्रिया-प्रक्रियेची वक्त्याकडून प्रशंसा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर: चंद्रपूरातील विविध विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काल गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या 'निर्भय बनो' या अभियांनांतर्गत सभेचे आयोजन "आम्ही निर्भय चंद्रपूरकर" या बॅनर खाली केले गेले.

या अभियानातील त्रिकुटापैकी डॉ विश्वभर चौधरी व ऍड असीम सरोदे यांनी या सभेस संबोधित केले.
सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या लोकशाही विरोधी हालचालिंना आटोक्यात आणायचे असेल तर लोकशाहीत सार्वभौम असलेल्या जनतेलाच साद घातली पाहिजे म्हणून या सर्व विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सजग नागरिकांनी एकत्र येऊन 'आम्ही निर्भय चंद्रपूरकर' या नावाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने या सभेचे आयोजन केले. चंद्रपूर शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास झालेली हजारोची गर्दी उल्लेखनीय होती याचीच चर्चा शहरात रंगलेली दिसून आली. समाज माध्यमांचा वापर न करता, प्रत्यक्ष संपर्कातून सभेचा प्रचार करण्यात आला. सभेकारिता येणाऱ्या खर्चाची तरतूदही निधी संकलन न करता दात्यांनी प्रत्यक्ष वस्तू वा सेवांचे पैसे देऊन संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या सभेस संबोधित करतांना ऍड असीम सरोदे यांनी सध्या हुकूमशाही कडे होत असलेल्या वाटचाली संदर्भात संविधानाच्या उल्लंघनाच्या नेमक्या घटनांवर बोट ठेऊन त्याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी श्रोत्यांना अवगत केले. ते म्हणाले, सध्या देशात जी राजकीय परिस्थिती आहे, ती अघोषित आणीबाणी आहे. राजकीय विरोधकांवर तसेच विरोधात बोलणाऱ्या पत्रकार, बुद्धिजीविंवर जी दडपणं आणली जात आहेत, त्याची कुठलीही तरतूद आपल्या संविधानात नाही.

डॉ विश्वभर चौधरीनी पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा मांडतांना सांगितले कि, गेल्या दहा वर्षात देशातील धनाढ्य लोकांना फायदा करून देण्यासाठी सात लक्ष एकर जंगल कापलं गेलं. ते म्हणाले सध्या जो बेगडी धर्मवाद आणि भंपक राष्ट्रवाद माजवला जातो आहे, त्याचं खरं कारण सरकारच्या आर्थिक आघाडीवरील अपयशात दडलं आहे.

न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात झालेल्या या सभेस चंद्रपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सभेचे संचालन डॉ योगेश दुधपचारे यांनी तर प्रास्ताविक बंडू धोतरे आणि आभार प्रदर्शन उमाकांत धांडे यांनी केले.