व्वा दादा व्वा! दांडियाचा गजर की, विधानसभेचे वेध!




व्वा दादा व्वा! दांडियाचा गजर की, विधानसभेचे वेध!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
स्वताचे कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रस्थापित तथाकथित नेत्यांना धडकी भरवणारी तुमची किमायच न्यारी.. काय तुमचा थाट..काय तुमचे कार्यकर्ते.. अहो हे सगळं तुम्ही शिकले कुठुन? ज्यांचे मार्गदर्शन तुम्ही सतत घेत असता.. उठता बसता मुखी ज्यांचे नाव घेता त्यांना सुद्धा हेवा वाटेल असाच तुमचा बाना.. बरे असो राजकारण करायचे म्हणजे येळा गबळ्याचे काम असते काय? ही कला तुम्ही अवगत केली तर कुणाच्या पोटात का बरं दुखावे? नतद्रश्ट मेले.. अहो तुम्हाला आमदारकीचे वेध लागले हा काय तुमचा दोष? भले भल्यांचे आयुष्य सरले परंतु ते स्वप्न तुम्हाला ऐन उमेदीच्या काळात पडले हे या पामराना बघवत नाही हो.. पण तुम्ही नेटाने उभे रहा.. राजुर -याची जनता तुम्हाला नक्की साथ देईल. जवळची साठवलेली पुंजी या कामी नाही तर कधी येईल. त्यांना तुम्ही दांडियाच्या माध्यमातून जो व्यासपीठ उभा करून दिला हे आजपर्यंत राजुरा शहरात कुणाला जमले काय? बाजूला शाळा असेल किंवा रुग्णालय असेल या लोकांना डिजे काय असतो हे केव्हा कळेल.. अहो दादा .. तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावे असेच कार्य तुम्ही करत आहात.. अगदी तुमच्या डीजे च्या बाजूला महिलांचे प्रसूती गृह आहे. प्रसव कळा सुरू असताना वाजणारा डीजे त्या पहीलटकरणीचे दुःख विसरायला मदत करीत आहे. आणि मुख्य म्हणजे जन्माला येणारे बाळ डिजे चा ताल धरून जन्माला येत आहे. भलेही ध्वनी प्रदूषणाचे नियम घालून दिले असतील पण ते तुम्ही का मानावे. उलट जन्म झाल्या बरोबर बाळाची श्रवणशक्ती इतकी मजबूत होत आहे की, मोठा झाल्यावर 100 डेसिबल चा आवाज ही त्याच्या श्रवणशक्ती पुढे फिका ठरेल. तुम्ही आनंद विखरत आहात दादा.. कुणास वाईट वाटायचे काहीच कारण नाही. भलेही खाजगीत ज्या-ज्या चर्चा रंगतात की, दादा कुणालाही चहा पाजत नाही!, कुणाला घासही घालत नाहीत! त्यांना जरा तुमच्या दांडियाच्या मंचावर बोलवाच. आणि जसे
 प्रदेश अध्यक्ष म्हणाले तशी त्यांची चहा पाण्याची व्यवस्था धाब्यावर करा. अशी म्हणण्याची वेळ येऊ नये!
मग कमाल बघा.. एक तरी पत्रकार तुमच्या बद्दल काही लिहिल तर शपथ.. शपथ तुमच्या विठ्ठलाची  बर का.. दादा तुम आगें बढो हम तुम्हारे साथ है। वेद विधानसभेचे!