आदिवासी देवी-देवतांच्या पूजनाला व समाजाच्या मेळाव्यात ना. मुनगंटीवारांचे पुष्पवृष्टीसह जल्लोषात स्वागत
दिनचर्या न्युज :-
*गडचिरोली,दि. २४* - गडचिरोलीवर माझे नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. कोणत्याही पदावर असलो तरीही त्या पदावर पोहोचण्याचा मार्ग याच जिल्ह्याच्या आशीर्वादाने प्राप्त झाला आहे. त्यामुळे विशेषत्वाने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. एवढेच नाही तर अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या कल्याणासाठी मी काम करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
गडचिरोली येथील महाराजा लॉनवर आमदार डॉ. देवराव होळी यांनी आयोजित केलेल्या आदिवासी देवी-देवतांच्या पुजनाचा कार्यक्रम तसेच आदिवासी समाजाच्या मेळाव्याला ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आदिवासी गोटूल समितीचे अध्यक्ष नंदूभाऊ नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, रविंद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, मुक्तेश्वर काटवे, डॉ. नरेश्चंद्र काटोले, एम.एम. आत्राम, मारोतराव इचोडकर, दिलीप चलाख, गोवर्धन चव्हाण, अविनाश पाल, हेमंत बोरकुटे, अॅड. पुराम, सुरेश शाह, विलास दशमुखे, लताताई पुनघाटे, जयश्री येलमे, लक्ष्मीताई कन्नाके, मनिषाताई मडावी, वर्षाताई शेडमाके, प्रभूदास येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यात ना. सुधीर मुनगंटीवार यांचे पुष्पवृष्टीसह जल्लोषात स्वागत झाले. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘मी कॉलेजचा विद्यार्थी असताना लोकसभा निवडणुकीसाठी उभा होतो. त्यावेळी गडचिरोली व मूल विधानसभेने दिलेली आघाडी मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या जिल्ह्याने केलेल्या प्रेमाचे व्याज कितीही सेवा केली तरीही फेडू शकणार नाही.’ यावेळी गडचिरोली जिल्ह्यासाठी व आदिवासीं समाजासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झालेल्या विकासकामांची विशेषत्वाने चर्चा झाली. त्यावर बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आदिवासी भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार पुढे आला त्यावेळी गडचिरोलीचाच पहिला अधिकार असल्याचे मी म्हणालो होतो. कारण इथे विद्यापीठ विकसित झाले आणि इथल्या तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळाले तर येथील तरुण वाघासारखा पराक्रम करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाला मान्यता देण्यात आली.’ चिचडोह व कोडगल प्रकल्पाचे रखडलेले कामही पूर्णत्वास नेण्याची संधी मिळाल्याचे समाधान ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी बांधवांसाठी आरक्षित असलेला निधी ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यानंतर पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय आम्ही केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढण्याची संधी प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले.
*ना. मुनगंटीवार स्वागताने भारावले*
ना. सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोली जिल्हयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आदिवासी समाजाच्या मेळाव्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निमंत्रणावरून ना. मुनगंटीवार गडचिरोलीमध्ये आले होते. यावेळी ठिकठिकाणी आदिवासींच्या परंपरेनुसार त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जिप्सीमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच काही ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीमध्ये ना. मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी आदिवासी, गोंडी बांधवांकडून ढेमसा नृत्य सादर करण्यात आले. या सर्व सत्काराने ना. मुनगंटीवार भारावले.
*आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण*
‘आदिवासी आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतो, पण या आश्रमशाळा इतरांकडून चालविल्या जातात. या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्यात आपण कमी पडत असल्याचे लक्षात आले. राज्य सरकार निधी खर्च करतेय, पण ज्या वेगाने आदिवासी विद्यार्थ्याची प्रगती व्हायला हवी पण ती होत नव्हती. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत अडकवून चालणार नाही, त्यांना नामवंत शाळेतच शिकवावे लागेल, यासाठी राज्य सरकारने निर्णय केला. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्याचे सौभाग्य मला लाभले,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*आदिवासी तरुण एव्हरेस्टवर पोहोचला*
‘मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना एकदा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत होतो. त्यातील एकाही विद्यार्थ्याने कधी विमान प्रवास केला नव्हता आणि साधे विमानतळही बघितले नव्हते. त्यातून ‘मिशन शौर्य’ची कल्पना सूचली. देशात पहिल्यांदाच असा पुढाकार एखाद्या सरकारने घेतला होता. आम्ही या अभियानांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. जे प्रशिक्षण घ्यायला इतरांना दोन वर्षे लागतात, ते प्रशिक्षण अवघ्या आठ महिन्यांत घेऊन आदिवासी तरुण २९ हजार २९ फुटांवर असलेल्या एव्हरेस्टवर पोहोचले. तिथे त्यांनी तिरंगा फडकवला. विमानात न बसताही सर्वोच्च उंचीवर पोहोचण्याची किमया आदिवासी तरुणांनी साधली. या पराक्रमासाठी देशगौरव
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ अॉगस्टच्या भाषणात आदिवासी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तेव्हा माझेही उर अभिमानाने भरून आले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
*आदिवासी तरुण होणार पायलट*
चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.‘एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास ५० लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे ४८ लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी ५० टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊ आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
*आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी…*
- बल्लारपूर येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठ उपकेंद्रात तीनशे आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतीगृह साकारणार
- तेंदुपत्ता तोडणाऱ्या आदिवासींना ७२ कोटींचा बोनस वितरित
- आदिवासी तरुण आयएएस, आयपीएस होण्यासाठी विशेष प्रयत्न
- गोंडवाना विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी प्रयत्नशील
- गोटूलच्या प्रश्नांसाठी पंधरा दिवसांच्या आत बैठक घेणार