मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी भाषेचा सुद्धा व्यवहारात उपयोग करणे आवश्यक आहे - डॉ. अमीर धमानी ग्रामगीता महाविद्यालयात हिंदी पंधरवाडा साजरा
दिनचर्या न्युज :-
चिमूर (प्रतिनिधी योगेश मेश्राम)
गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई आणि ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी भाषेला संपूर्ण भारत देशात स्वीकृत करण्यासाठी येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी मुंबईचे सदस्य प्राचार्य डॉ. विजेंद्र बत्रा, सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी हिंदी भाषा ही भारत व इतर अनेक देशांमध्ये प्रामुख्याने बोलली जात असली तरीही आज पावतो हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला नसून त्याबाबतीत येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन करत असताना हिंदी भाषेला प्राचीन महत्ता लाभलेली असून अनेक शब्दांनी समृद्ध अशी भाषा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात हिंदी भाषेचा उपयोग केले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल उपस्थित होते. त्यांनी सुद्धा हिंदी भाषेमध्ये अनेक महान साहित्य प्रकाशित झाले त्या साहित्यांच्या समृद्धीबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करून घेण्याची जिज्ञासा जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे वक्ते म्हणून बोलत असताना डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी सुद्धा मराठी भाषेसोबतच हिंदी सुद्धा समृद्ध भाषा असून आपल्या संवादामध्ये हिंदी भाषेला स्थान देऊन मराठी सोबतच हिंदी भाषेचा सन्मान वाढविला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या हस्ते डॉ. विजेंद्र बत्रा आणि डॉ. अश्विन चंदेल यांचे शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमीर धमानी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात हिंदी ही महत्त्वाची भाषा असून या भाषेमध्ये अनेक शब्दांची उपलब्धता आहे व दैनंदिन उपयोगात बोलणाऱ्या भाषेमध्ये हिंदी प्रमुख भाषा आहे म्हणून मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी भाषेचा सुद्धा व्यवहारात उपयोग करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बिजनकुमार शील तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सरताज शेख यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.