शासकीय जागेतून रस्ता करून देण्यासाठी सरपंचाने केली लाखोंची मागणी राजू भैसारे यांचा पत्रकार परिषदेत आरोप chandrapur



शासकीय जागेतून रस्ता करून देण्यासाठी सरपंचाने केली लाखोंची मागणी
राजू भैसारे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सर्वे क्रमांक ९८३/१ मधील ०.९४ हे.आर ही शेतजमीन धर्मानंद नागदेवते व लता देवेंद्र नागदेवते यांच्याकडून मातृभूमी रियल इस्टेटचे मालक राजू भैसारे यांनी विकत घेतली. यानंतर जागेचे कागदपत्र रितसर स्वत:च्या नावाने केली. यानंतर जमीन प्लॉटसाठी विकसित केली. परंतु, या शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. नायब तहसीलदाराने रस्ता मंजूर केला. परंतु, नवरगावचे सरपंच राहुल बोडणे यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर करून नायब तहसीलदाराचा आदेश रद्द करण्यास भाग पाडून रस्ता करून देण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप भैसारे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

भैसारे यांच्या अर्जावरून नायब तहसीलदार धात्रक, रत्नापूर येथील तलाठी आकरे आणि मंडळ अधिकारी नवरगाव यांनी मोक्का चौकशी करून शेतमालकास महसूल अधिनियम १९६६ च्या कलाम १४३ नुसार शेतमालकास नावरगाव सर्वे क्रमांक १९ आराजी ०.६० हे.आर या सरकारी पडीत जमिनीतून उत्तर दक्षिण 8 फूट व दक्षिण टोकापासून ते सर्वे क्रमांक ९८३/१ पर्यंत जाण्यायेण्याकरिता रस्ता मंजूर केल्याचा आदेश २७ डिसेंबर रोजी काढला. सर्वे क्रमांक १९ ही पडीत जमीन सिंदेवाहीṁ-चिमूर या राज्य मार्गाला लागून आहे. वास्तविक ही पडीत जागा सरकारी महसूल विभागाची आहे. मात्र नवरगाव येथील सरपंच राहुल बोडणे यांनी आपले राजकीय वजन वापरून ग्राम पंचायतचा ठराव घेत तहसीलदार यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचा आदेश रद्द करायला लावले. परंतु, तहसीलदार यांनी याबाबतची साधी सूचना किंवा नोटीस देखील राजू भैसारे यांना दिली नाही. एका जबाबदार अधिकाऱ्याने राजकीय दबावाला बळी पडून नियमबाह्य आदेश काढल्याचा आरोप राजू भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
रद्द केलेल्या आदेशाची प्रत घेऊन सरपंच राहुल बोडणे यांनी ऑफिसमध्ये येऊन सरकारी जागेतून रस्ता करून देण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली असल्याचे राजू भैसारे यांनी सांगितले. याबाबतची तक्रारही भैसारे यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात दिली आहे.

वास्तविक सर्वे क्रमांक १९ ही जागा चिमूर-सिंदेवाही या राज्य मार्गालागत असून शासकीय नियमानुसार मुख्य रस्त्याच्या माध्यभागापासून ३७ मीटर पर्यंत कुठलेही बांधकाम करता येत नसताना देखील उपविभागीय अभियंता बांधकाम शटगोपानवार यांनी राहुल बोडणे यांना बांधकामाची नियमबाह्य परवानगी दिली. या सर्व प्रकरणातून एकच गोष्ट सिद्ध होते की राजकीय वजन वापरून अधिकारी लोकांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे हा एकमेव उद्देश राहुल बोडणे याचा असल्याचा आरोप मातृभूमी रियल इस्टेटचे मालक राजू भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.