गोंडवाना विद्यापिठाचे "स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली", असे नामकरण करण्यात यावे....
आदिवासी समाजाची एकमुखी मागणी ११ मार्च, २०२३ ला भव्य धरणे आंदोलन
दिनचर्या न्युज :-
गडचिरोली / चंद्रपूर :
चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहुल जिल्हे असुन शैक्षणिकदृष्टया अत्यंत मागास असा प्रदेश आहे. या भागातील आदिवासी विद्यार्थ्याचा उच्च शिक्षणातील अत्यंत घसरलेला टक्का लक्षात घेऊन २ ऑक्टोबर २०११ रोजी नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन गोंडवाना विद्यापिठाची निर्मिती करण्यात आली. या भागातील आदिवासी विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने या विद्यापिठाची निर्मिती करण्यात आली. पण विद्यापिठ निर्मितीचा मुख्य उद्देश बाजुलाच राहुन विविध अनावश्यक कारणाने हे विद्यापीठ सदैव वादाच्या भोव-यात अडकुन पडले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता विद्यार्थ्याची गळती व स्थगिती अधिक कशी होईल याचीच तजवीज विद्यापिठ व्यवस्थापन करतांना दिसते. विद्यापिठाची स्थापना होऊन १५ वर्षे उलटूनही विद्यापिठाचे पदव्युत्तर महाविद्यालय (PGTD) अस्तित्वात आले नाही. अनेकवेळा अभ्यासक्रमाची व परिक्षेची पध्दत बदलण्यात येते. भरमसाठ परिक्षा फी आकारून विद्यार्थ्यांना परिक्षेपासुन वंचित ठेवण्याची तजवीज पध्दतशीरपणे केली जात आहे. विद्यापिठाचे वसतीगृह निर्माण झाले नाही. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे विद्यापीठ सापडले आहे.
चंद्रपूर गडचिरोली जिल्हयाची सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता हा भाग गोंडवन म्हणुन ओळखला जातो. ही ओळख कायम रहावी म्हणून विद्यापिठाला गोंडवाना विद्यापिठ असे नांव देण्यात आले. परंतु विद्यापिठाच्या या पंधरा वर्षाच्या कालखंडात सात कुलगुरु झालेत. यात एकही आदिवासी व्यक्ति कुलगुरु होऊ शकला नाही हे आदिवासींचे दुर्देव. आदिवासीमध्ये विचारवंत, उत्तम प्रशासक, अभ्यासु व्यक्ति नाहित काय ? कि आदिवासींना डावलण्याचे षडयंत्र आहे ? आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकिय व एकुणच समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापिठाच्या व्यवस्थापनाला आदिवासी अध्यासन निर्माण करण्याची गरज वाटली नाही काय ? कि हे ही एक कारस्थान समजावे ? ज्यांचा या गोंडवानाशी व यात वास्तव्यास असणा-या लोकांच्या समाज जीवनाशी कवडीचाही संबंध नसणा-या प्रस्थापित नावांचा विचार विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी केला जातो हे ही एक षडयंत्रच आहे. गोंडवनात पाचशे ते सहाशे वर्ष गोंड राजांचे एकछत्री साम्राज्य राहिले आहे. याच भूमित १८५७ च्या राष्ट्रीय उठावात आपल्या प्राणाची आहुती अवघ्या पंचेविसाव्या वर्षी देणा-या स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचा प्रामुख्याने विचार करावाच लागेल. गोंडवाना विद्यापिठाचे "स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली" असे नामकरण करण्यात यावे या एकमेव मागणीसाठी दि. ११ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे धरणे आंदोलन लाक्षणिक स्वरुपाचे असुन यावर काही सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नाही तर पुढील आंदोलन तिव्र स्वरुपाचे राहिल. आदिवासी आपल्या अस्मिता व अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आदिजन चेतनेचा जागरचे अध्यक्ष मा. अशोक तुमराम व आदिवासी एकता युवा समिती, गडचिरोलीचे अध्यक्ष मा. उमेशभाऊ उईके यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेस श्री. प्रदिप कुलसंगे, माणिक गेडाम, प्रफुल कोडापे, संजय मसराम, वासुदेव कोडाप, मंगेश नैताम, मुकुंदाजी मेश्राम, संजय उईके, सुधीर मसराम, आकाश कोडापे, गिरीश उईके, प्रशांत मडावी, रमेश चीकराम, कमलेश आत्राम, वामन गणवीर इ. आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. या धरण आंदोलनात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहुन अस्मितेचा लढा अधिक प्रभावी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.