आता कॉपी बहाद्दरांवर करडी नजर, संवेदनशील केंदावर कडक बंदोबस्त करा - जिल्हाधिकारी विनय गौडा
कॉपीमुक्त अभियान व दक्षता समितीचा आढावा*
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 17 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून कॉपी बहाद्दरांवर कडक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कॉपीमुक्त अभियान व जिल्हा दक्षता समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्र परदेसी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या भरारी पथकाव्यतिरिक्त महसूल विभाग व जिल्हा परिषद विभागाचे तालुका स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात संवेदनशील परीक्षा केंद्रे कोणती आहेत व कोणत्या केंद्रावर 10 वी व 12 वी चे पुन्हा पुन्हा परीक्षा देणारे (रिपीटर्स) विद्यार्थी आहेत, ते तपासा. कॉफी बाहादरावर करडी नजर, संवेदनशील केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असायला पाहिजे. जिवती, कोरपना अशा संवेदनशील तालुक्यात परिरक्षण केंद्र शासकीय कार्यालयात ठेवण्याचे नियोजन करा. गैरप्रकार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची झडतीवेळी शिक्षकांसोबत पोलिस पाटील आणि कोतवाल तर विद्यार्थीनींचे झडतीवेळी अंगणावडी सेविका आणि महिला शिक्षक असणे गरजेचे आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याचे नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
जिल्ह्यात 12 वी चे एकूण विद्यार्थी 27900 आणि परीक्षा केंद्र 83 तर 10 वी चे एकूण विद्यार्थी 28683 आणि परीक्षा केंद्राची संख्या 125 आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलिस अधिनियम 37 (1)(3) चा वापर करणे, पोलिस बंदोबस्त ठेवून परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत अनधीकृत व्यक्तिंना प्रवेशबंदी, सर्वसाधारण, संवेदनशील व अतिसंवेदनशील परिक्षा केंद्राचे वर्गीकरण करणे, 1973 च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश, 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे. तसेच परिक्षा इमारतीच्या परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप इत्यादी वापरावर प्रतिबंध आदी सुचना देण्यात आल्या आहेत.
दिनचर्या न्युज