इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये पोळा सण व गणेश मूर्ती निर्माण स्पर्धा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : दि एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. पूर्व-प्राथमिक ते सहावी इयत्तेतील विद्यार्थी व मुलींनी आपल्या नंदीसह पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन शाळेचे वातावरण परंपरेच्या रंगात रंगवले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था सचिव किष्णा नायर होते. हा संपूर्ण कार्यक्रम उपप्राचार्या पायल कोम्मुरु यांच्या देखरेखीखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी शरलीन उराडे हिने पोळा सण का आणि कसा साजरा केला जातो याची माहिती दिली.
इयत्ता चौथीची विद्यार्थिनी शर्वरी साधनकर हिने शेती आणि बैलांचे महत्त्व या विषयावर एक सुरेल गीत सादर केले व त्यावर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता सहावी व सातवीच्या मुलांनी एका सुंदर नाटकाच्या माध्यमातून शेतीतील बैलांचे महत्त्व आणि आधुनिक यंत्रांच्या युगातही त्यांची उपयुक्तता सांगितली. नाटकात मुलांनी अतिशय हृदयस्पर्शीपणे 'प्लास्टिक वापर थांबवा' असा संदेश दिला. यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्यातून पोळा सणाचे महत्त्व विषद केले. मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी मुलांच्या कामगिरीचे कौतुक केले. हेड गर्ल निधी तुम्मालवार यांनी आभार मानले.
यावेळी नंदी सजवून पारंपारिक वेशभूषेत आणलेल्या मुला-मुलींची चाचणी घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच आगामी गणेशोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थीयांसाठी गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता तिसरी ते दहावीच्या ६५ विद्यार्थ्यांनी मुर्ती निर्माण स्पर्धेंत सहभाग घेतला. या मूर्तींचे परीक्षण केल्यानंतर मुलांना त्यांच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी बक्षीस दिले जाईल.
एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीचे संचालक श्री. राहुल पुगलिया यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे सादरीकरण आणि दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दिनचर्या न्युज