वरिष्ठतम संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीची बैठक




वरिष्ठतम संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीची बैठक


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर,दि. 15 जुलै : मुख्य रस्त्यावर उभी असलेली जड वाहने, मोकाट जनावरे, दुचाकीवरील स्टंटबाजी आदी कारणांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोलिस विभाग, वाहतूक शाखा आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने अपघात होऊ नये, यासाठी गांभिर्याने काम करावे, असे स्पष्ट निर्देश खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिले.

नियोजन सभागृह येथे केंद्र सरकारच्या वरिष्ठतम संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे आदी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा नियंत्रण ही जबाबदारी उप –प्रादेशिक परिवहन विभागाकडे असल्यामुळे त्यांनी संबंधित सर्व विभागांसोबत योग्य समन्वय ठेवावा, असे सांगून खासदार बाळू धानोरकर म्हणाले, आपापल्या कर्तव्यात तत्पर राहा. रस्ते मोठे झाले असून रस्त्यावरील अपघात कसे कमी करता येतील, याबाबत योग्य नियोजन करा. अपघात होण्याचे प्रमाण सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत जास्त असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे या कालावधीतच नव्हे तर संपूर्ण ड्युटीच्या वेळी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर अतिशय कार्यतत्पर राहावे. बहुतांश वाहतूक पोलिस (पुरुष आणि महिला) मोबाईलवर असल्याचे दृष्टीक्षेपास पडते. त्यांना पोलिस अधिक्षकांनी सुचना कराव्यात.

दुचाकीवर स्टंटबाजी करणा-यांविरूध्द कडक कारवाई करा. विविध मार्गांवर माईल स्टोन, गावाच्या नावाचे फलक, दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. अपघातासंदर्भात जिल्ह्यातील 18 धोकादायक ठिकाणांवर दर सहा महिन्यात गतीरोधकांवर काळे –पांढरे पट्टे मारावे. 11 वी ते पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रियदर्शनी सभागृहात जिल्हास्तरीय मेळावा घेण्याचे नियोजन करावे. तसेच शहरातील जेटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी समितीचे गठन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, अपघातात मदत करण्यासंदर्भात संबंधितांना प्रोत्साहन बक्षीस मिळण्याबाबत गावस्तरावर जनजागृती करावी. जेणेकरून अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी नागरिक समोर येतील. अनेकजण पोलिस आणि न्यायालयाचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून समोर येत नाही. याबाबतही नागरिकांना माहिती द्यावी. वाहतूक पोलिसांनी विनाकारण शेतक-यांच्या मालवाहू गाड्यांना अटकाव करू नये, अशी सुचना त्यांनी केली.

प्रास्ताविकात उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. मोरे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 लक्ष 73 हजार वाहनांची नोंदणी आहे. कोरोना काळात अपघातांची संख्या कमी होती. मात्र आता ती वाढल्याचे निदर्शनास येते. 2020 – 21 मध्ये जिल्ह्यात 319 अपघात झाले यात 171 लोकांचा मृत्यु झाला. तर 2022 मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात अपघातांची संख्या 474 वर पोहचली असून यात 242 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. तसेच विना हेल्मेट न घालणा-यांचे मृत्युचे प्रमाणही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.