महिलांनी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करावा-डॉ. मिताली सेठी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 1 जून : जिल्ह्यातील महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणारे “रुरलमार्ट” निर्माण करून देण्याचे काम सुरू असुन उपस्थित महिलांनी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करावा. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले.
कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेतील मा.सा.कन्नमवार सभागृहात दि. 28 ते 30 मे 2022 या कालावधीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या तीन दिवसीय शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, नाबार्ड व्यवस्थापक तृणाल फुलझेले, धारीवाल पावर प्लांटचे दिनेश गाखर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील भुजाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण देशात कोरोनाचे संकट ओढवले, या परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर तसेच लघू आणि मध्यम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. या अनुषंगाने राज्य शासन, जिल्हा प्रशासन व युथ एड फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याकरिता उद्यमिता यात्रा व विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 294 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अजय बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा स्वाती धोटकर यांनी जलपर्णी वनस्पतीपासून टाकाऊ पासून टिकाऊ व सुंदर अशा सुशोभनिय पुष्पगुच्छ शोभेच्या भेटवस्तू तयार करण्याचा पुढाकार घेतला आहे, या उपक्रमाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी त्यांचा सत्कार केला व अशा महिला उद्योजकांना प्रशिक्षणासाठी जिल्हा प्रशासन प्रोत्साहन व सहकार्य करत असल्याचे सांगितले.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची व योजनांची माहिती देत प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या नवीन उद्योजकांना मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी एकविसाव्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे भक्कम योगदान आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी जिद्दीने पुढाकार घेऊन स्वयंरोजगारातून जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावतील. कार्यक्रमाला उपस्थित महिला व युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सहाय्यक प्राध्यापक किरणकुमार मनुरे यांनी मानले.
दिनचर्या न्युज