स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत लावला खुनातील मारेकऱ्यांचा छडा



स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत लावला खुनातील मारेकऱ्यांचा छडा


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक ज्यूबिली हायस्कूलच्या परिसरात मात्र मागील भागात असलेल्या जटपुरा गेट ते रामाळा तलाव मार्गावरील शिक्षण भवनाच्या जुन्या पडक्या इमारतीच्या छतावर एका 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला ह्या संदर्भात माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिथे हात पाय चिकटपट्टी बांधून मारहाण करून हत्या केलेल्या युवकाचे शव आढळून आले.

घटनास्थळी सर्वत्र दारूच्या बाटल्या विखुरलेल्या होत्या तसेच त्या युवकाला बांधून दारूची बाटली डोक्यावर फोडून त्याची हत्या करण्यात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत होते मात्र ही हत्या करणाऱ्यांनी सराईत गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठलाही पुरावा सोडला नव्हता. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे ह्यांनी चंद्रपूर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेला मृतकाची ओळख पटविणे व हत्येचे कारण शोधून मारेकऱ्यांना हुडकून काढण्याचे कठीण काम सोपविले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत प्रकरणाचा छडा लावून 3 आरोपींना जेरबंद केले असुन त्यांच्यावर पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप. क्र. 327 / 2022 कलम 302, 201 भाद.वी. अन्वये गुन्हा नोंद केला.जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशनुसार घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्याचे अधिनस्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांचे दोन पथक तयार करून मयत ईसमाची ओळख व आरोपी शोध सबधाने त्यांना सुचना देण्यात आल्या.

मृतकाबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सदर युवकाचे नाव राहुल विलास ठक असुन तो भारतीय स्टेट बँकेच्या समोर, पेठ वॉर्ड राजुरा येथील रहिवासी असून तो चंद्रपूर येथे डॉ. चिल्लरवार यांचेकडे वाहन चालक म्हणून काम करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने हत्येचे कारण व मारेकरी कोण ह्याकडे आपले लक्ष वळविले.

पोलिसांना प्राप्त माहितीनुसार अंदाजे 1 वर्षापुर्वी त्याचे एक स्त्री सोबत मोबाईलवर काहीतरी मेसेज केले होते त्यावरून वाद झाला होता व त्या स्त्रीच्या दोन मुलांनी राहुल यास मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ राजुरा येथील त्या महिलेचा शोध घेवून तिच्या घरी जावून चौकशी केली असता त्यांचा लहान मुलगा घरी होता तर मोठा मुलगा हा नाशिक येथील एम आय डी सी मध्ये कामाला असून पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुलगा नामे वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिकला आहे किंवा कसे या बाबत माहिती घेतली असता तो मागील तिन दिवसापासून नाशिक वरून चंद्रपूर ला आल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीतून अनेक संशय निर्माण होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने अधिक चौकशी करून चंद्रपूर येथील त्याचा जवळचे मित्रांची माहिती घेतली असता संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बलेवार वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर चंद्रपूर ह्याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता तो कोणतेही समाधान कारक उत्तरे देत नव्हता. दरम्यान गोपनिय सुत्रांकडून विश्वसनिय माहिती मिळाली की, संशयित वैभव डोंगरे हा एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे. मिळालेल्या खबरी वरून स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

वैभव डोगरे व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र नामे कार्तीक रमेश बावणे वय 25 वर्षे रा आंबेडकर चौक सिंदेवाही यांना विचारपूस केली असता वैभव डोंगरे याने सांगीतले की, त्याचे मयत राहुल याचेशी मागील एक वर्षाआधी झालेल्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने 1) संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बलेंवार वय 30वर्षे रा. इंदीरा नगर. चंद्रपूर व 2) कार्तीक रमेश बावणे वय 25वर्षे रा आबेडकर चौक सिंदेवाही यांचे मदतिने रात्री 8 च्या दरम्यान राहुल ठक ह्याला नेऊन त्याला त्या ठिकाणी दारू पाजून त्याचा गळा आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जिवानीशी ठार मारले व जवळ असलेल्या चिकटपट्टीने बांधून प्रेत त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले.

सदर गुन्हयात नमुद तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे चंद्रपूर शहर करीत आहे. सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, शेखर देशमुख, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे याचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, स. फौ राजेंद्र खनके, पोहवा. स्वामी चालेकर, संजय आतंकुलवार, नितीन साळवे, सुरेंद्र मोहतो, ना. पो. कॉ. सुभाष गोहोकार, चंदू नागरे, संतोष येलपूलवार, गणेश मोहुर्ले पो कॉ सतिश बगमारे, कुंदन बावरी, रवि पंधरे, गोपिनाथ नरोटे, प्रांजल झिलपे यांनी केली असुन पुढील तपास सबंधीत पो.स्टे. करीत आहे.