चोर बीटी, बोगस खते आढळल्यास धडक कारवाई करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार




उत्पादन वाढीसाठी बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक

चोर बीटी, बोगस खते आढळल्यास धडक कारवाई करण्याचे निर्देश

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 6 मे : चंद्रपूर जिल्हा हा कोळसा खाणी, उद्योगधंदे यासोबतच बहुआयामी पिके घेणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपासोबतच रब्बी पिकाचा पेरा वाढला तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच तालुक्याचे सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्याचे पर्जन्यमान चांगले असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे येथे पाण्याची उपलब्धता आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, या पाण्याचा उपयोग रब्बीच्या पिकांसाठी झाला पाहिजे. रब्बी हंगामात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीचा पेरा वाढवा. यापुढे खरीप हंगामाप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामपूर्व आढावा घेतला जाईल.

बोगस खतामुळे शेती उद्ध्वस्त होते. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. त्याच्या वाहतुकीवर, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. पिकाच्या उत्पादन वाढीसाठी घरगुती बियांण्यावर प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता, तपासणी व प्रात्यक्षिक मेळाव्याचे तालुकास्तरावर आयोजन करावे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे दरवर्षी पिकाचे वाण बदलावे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

विविध उत्पादनामध्ये प्रगतशील असणा-या शेतकऱ्यांची एक टीम तयार करून त्यांचे अनुभव कथन व शेतीविषयक मार्गदर्शनासाठी सत्र राबवावे. अशा अनुभवाचा इतर शेतक-यांना फायदा होतो. हळद हे नगदी पीक आहे. भद्रावती, वरोरा व चिमूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. या पिकाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होत आहे. हळद पिकांला चांगला भाव असून या पिकाच्या क्षेत्रवाढीकरीता क्लस्टर उभारण्यात येईल. याचा फायदा ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी होईल, असेही ते म्हणाले.

यावर्षी जिल्ह्यात सुमारे 77 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी एकूण हवामान, पावसाचा अंदाज, परिसरातील हवामानबाबत शेतकऱ्यांना कसा सल्ला देता येईल यासाठी योग्य नियोजन करावे. दुबार पेरणीची शक्यता लक्षात घेऊन बियाण्यांचा व खतांचा साठा वाढविण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवावी. मागील वर्षी 722 कोटीचे पीक कर्ज वाटप झाले असून यावर्षी 950 कोटीचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत नाही, ही गंभीर बाब आहे. यावर्षी जर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, दुग्ध व्यवसाय हा शेतीसंलग्न असलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे. प्रायोगिक तत्त्वावर दुधासाठी नागभीड, वरोरा, चिमूर, सिंदेवाही येथे मदर डेअरीचे प्रकल्प सुरू आहेत. या तालुक्यांमध्ये चारा लागवडीसाठीचे प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने त्वरीत पाठवावे.

महाज्योतीमुळे करडई पिकाला मोठी मदत मिळाली असून चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, नागभीड व वरोरा हे करडई उत्पादन करणारे तालुके आहेत. करडईचा पेरा वाढविण्यासोबतच त्याचे ब्रँडिंग व प्रोसेसिंग करण्यावर भर द्यावा. प्रायोगिक तत्त्वावर करडई पिकाचे जास्त उत्पादन करणाऱ्या तालुक्यात युनिट उभारता येईल. यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यासोबतच जिल्ह्यातील सरासरी पेरणी क्षेत्र व उत्पन्न क्षेत्र यांचे योग्य नियोजन करावे, अशा सुचना कृषी विभागाला दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते खांबाडा येथील सुरेश गरमाडे या प्रगतशील शेतक-याचा सत्कार करण्यात आला.

बैठकीची सुरवात हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेती उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते.

दिनचर्या न्युज