मतदान करणे हा देशसेवेचा एक भाग - मनपा आयुक्त विपीन पालीवाल
- लोकशाही पंधरवडा निमित्त सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे सर्व पात्र मतदारांना आवाहन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, ता. ०३ फेब्रु : शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन.सी.सी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे गरजेचे आहे. किंबहुना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे होय, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. सध्या सुरु असलेला (२६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२२) लोकशाही पंधरवडा व आगामी महापालिका निवडणुक यांच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतदार या विषयावर त्यांनी नागरिकांना आवाहनपर भाष्य केले.
मतदान प्रक्रियेचे महत्व सांगताना ते म्हणाले की, मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, असा विचार करणे म्हणजे लोकशाही कमकुवत करण्यासाठी आपणच पुढाकार घेण्यासारखे आहे. कारण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मताने मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन साजरे करतो. तसेच नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. त्याचप्रमाणे मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशीच कर्तव्यभावना व देशभक्तीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.
त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहरातील सर्व पात्र मतदारांनी अवश्य मतदान करून लोकशाही यंत्रणा सक्षम करण्यात आपली भूमिका वठवावी, असे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
दिनचर्या न्युज