सोंडो येथील श्री सिध्‍देश्‍वर मंदीराचा जिर्णोध्‍दार करणार – आ. सुधीर मुनगंटीवार.





सोंडो येथील श्री सिध्‍देश्‍वर मंदीराचा जिर्णोध्‍दार करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

विमानतळ उभारणीसाठी सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करू

*राजुरा शहरातील शेकडो नागरिकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश*


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
तळागाळातील गोरगरीबांच्‍या कल्‍याणासाठी, उत्‍थानासाठी राजकारण न करता समाजकारणाच्‍या माध्‍यमातुन जनसेवा करणारा एकमेव पक्ष म्‍हणजे भारतीय जनता पक्ष होय. या पक्षाच्‍या विचारावर विश्‍वास व्‍यक्‍त करत भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण आपल्‍या हाती घेतला याचा मला मनस्‍वी आनंद होतो आहे, असे उद्गार अनेक कार्यकर्त्‍यांच्‍या पक्षप्रवेशप्रसंगी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. तसेच राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्र येत्‍या महिन्‍याभरात पूर्ण कार्यक्षमतेने नागरिकांच्‍या सेवेत रूजु होईल या सोबतच राजुरा तालुक्‍यातील सोंडों येथील श्री सिध्‍देश्‍वराचे मंदीर पूर्ण भक्‍तीभावाने उभारण्‍या येईल.

दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी राजुरा शहरातील श्री राजू डोहे आणि चमूने भारतीय जनता पार्टीमध्‍ये आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले, आशिष ताजने, निलेश ताजने, सतिश धोटे, सतिश उपलंचीवार, शिवाजी सेलोकर, अरविंद डोहे, संजय मुसळे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्‍या पदाधिका-यांद्वारे शहरातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, कोणत्‍याही देशाची शान, संपत्‍ती ही त्‍या देशाचे गुणवान विद्यार्थी असतात. कोणता देश किती धनवान आहे त्‍यावर त्‍या देशाचे मुल्‍यांकन होत नाही तर तो देश किती गुणवानांचा आहे यावरून आकलन आणि मुल्‍यांकन होते. भारतीय जनता पार्टी हा सत्‍तेसाठी नव्‍हे तर सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे. कर्तृत्‍व, सेवाभावी वृत्‍ती महत्‍वाची असून गोरगरीब जनतेच्‍या विकासासाठी, उन्‍नतीसाठी काम करणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा आहे.

आ. मुनगंटीवार यांनी राजुरा शहरातील अनेक प्रश्‍नांना हात घालत असताना राजु-यात मुर्ती या ठिकाणी विमानतळ आणण्‍यासाठी अथक प्रयत्‍न केले, परंतु महाविकास आघाडी सरकार कासवाला सुध्‍दा लाज वाटेल या गतीने या विमानतळासाठी काम करीत आहे, पण मी हे विमानतळ पूर्णत्‍वास आणण्‍यासाठी विधीमंडळामध्‍ये शासनाशी संघर्ष करेन. हे विमानतळ पूर्ण झाल्‍यास संपूर्ण भारतातील उद्योगपती येथील जुन्‍या व होणा-या नविन उद्योगांसाठी येथे येतील. येथे डिफेन्‍स इक्‍युपमेंट चे उद्योग लावायचे असेल तर यासाठी मा. श्री. रतनजी टाटा उद्योग स्‍थापन करण्‍यासाठी इच्‍छूक आहेत. यासोबत राजुरा तालुक्‍यातील अनेक महत्‍वपूर्ण प्रश्‍न ज्‍यामध्‍ये शेतक-यांचे प्रश्‍न, अनुसुचित जाती, जमातीचे प्रश्‍न, महात्‍मा ज्‍योतीबा फुले योजनेअंतर्गत कर्जमुक्‍तीचा फायदा चंद्रपूर जिल्‍हयातील २ लाख शेतक-यांना झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजनेचा फायदा जिल्‍हयातील ३७ हजार नागरिकांपर्यंत पोचलेला नाही हे प्रश्‍न पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करून सोडविण्‍यात येईल. राजुरा शहरातील तलावात इकॉर्निया वनस्‍पती वाढल्‍यामुळे मच्‍छीमारांवर उपासमार आलेली आहे, हा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सचिव मनिषा पाटणकर– म्‍हैसकर, जिल्‍हाधिकारी चंद्रपूर, मुख्‍याधिकारी राजुरा यांच्‍याशी झूम मिटींग द्वारे चर्चा करून तलावाच्‍या स्‍वच्‍छतेसोबत, सौंदर्यीकरण करून तलावाचे काम पूर्ण करण्‍यासाठी नियोजन केले जाईल.

भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केलेल्‍या सर्वांनी सामान्‍य नागरिकांच्‍या आयुष्‍यात आनंद पोहचविला पाहीजे यासाठी पर्यावरण, आरोग्‍य, स्‍वच्‍छता, निराधारांची सेवा केली पाहीजे. मला प्रामुख्‍याने सांगावेसे वाटते देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी कोरोनामध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना ५०,०००/- रू. देण्‍याचे ठरविले आहे. आपण यासाठी सहकार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे.

राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावेळी ते म्‍हणाले, आरोग्‍य सेवेची इमारत तर तयार आहे. तिला पूर्ण क्षमतेने सुरू करावयाचे असल्‍यास डॉक्‍टर्स, परिचारीका, अन्‍य कर्मचारी, अत्‍याधुनिक वैद्यकीय साधन-सामुग्री उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक आहे. या सा-या कामांची यादी तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांना देवून येत्‍या दोन महिन्‍यात पूर्ण कार्यक्षमतेने प्राथमिक आरोग्‍य केंद्र सुरू करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले. त्‍याचबरोबर चंद्रपूरमधील मेडीकल कॉलेजचे ७५ टक्‍के काम पूर्ण झालेले असून ते अंतिम टप्‍प्‍यात आहे. जिल्‍हयातील कोणत्‍याही गंभीर आजारासाठी त्‍याला नागपूरला जाण्‍याची आवश्‍यकता पडू नये. ज्‍यानंतर चंद्रपूर जिल्‍हयातील गोरगरीबांचा प्रत्‍येक प्रकारच्‍या आजाराचा उपचार चंद्रपूरच्‍या मेडीकल कॉलेजमध्‍ये होईल. शिर्डी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन थ्री टेस्‍ला मशीन या महाविद्यालयाला उपलब्‍ध करण्‍यात आलेली आहे. टाटा ट्रस्‍टच्‍या मदतीने उभारण्‍यात येत असलेले कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे काम प्रगती पथावर आहे. जिल्‍हयात ६५ पी.एच.सी. सेंटर आहेत. चिंचोली येथे महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत महामंडळाचे सबस्‍टेशन मिळवून देण्‍यात येईल. गेल्‍या चार महिन्‍यापासून निराधार योजनेचे पैसे मिळत नाही आहे ते सुध्‍दा मिळवून देण्‍यासाठी मी प्रयत्‍नरत आहे. सोयाबीनची नुकसान भरपाई यासारख्‍या अनेक प्रश्‍नांसाठी विधीमंडळातील संसदीय आयुधांचा वापर करून हे प्रश्‍न सोडविले जातील असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

राजुरा तालुक्‍यातील सोंडों येथील श्री सिध्‍देश्‍वराच्‍या मंदीराची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मंदीराच्‍या उभरणीसाठी आपण सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करू. येथील १२ ज्‍योर्तिलिंगाच्‍या उभारणीसह मंदीराचा जिर्णोध्‍दार व परिसराचे सौंदर्यीकरण करण्‍यात येईल. याकामाचा आराखडा निष्‍णात अभियंत्‍याकडून करवून घेऊ या कामासाठी राज्‍य शासनाशी पाठपुरावा करून निधी उपलब्‍ध करून दिला जाईल, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.