आदिवासी परधान समाजाच्या वतीने कै. बाबूरावजी मडावी यांची पुण्यतिथी साजरी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आदिवासी समाजाचे लोकनेते के. बाबुरावजी मडावी यांची पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बाबुरावजी मडावी हे देश पातळीवर आदिवासीं समाजाला संघटित करणारे एकमेव नेते होतें. त्यांचा सामाजिक तथा राजकिय प्रवास खूप मोठा असून त्यांच्या जिवन काळात त्यांनी सत्तेत मंत्री असताना सुद्धा सत्तेचा विचार न करता आदिवासीं समाजावर कुठलाही अन्याय होऊ दिला नाही. अशा हया आदिवासीं नेत्याचा इतिहास समझने फार महत्त्वाचे आहे.
बाबुराव मडावी यांचा जन्म
27 नव्हें.1927 व मृत्यू 16 जून 2003. “मडावीसाहेब आणखी दहा वर्ष जगले असते तर आदिवासी समाज अन्यायमुक्त झाला असतां “ हे निर्विवाद सत्य आहे.आज 16 जून 2021 म्हणजे 18 वर्ष त्यांच्या देहवसानाला पूर्ण झालीत.हा मोठा कालखंड आहे.या काळाच अनेक राजकीय नेते व सामाजिक नेते उदयाला आले. तरि बाबुरावजींची उणीव भासते कारण त्या कर्तुत्ववान माणसाने आदिवासीं हितासाठी ज्या पद्धतीने वाहून घेतले त्यानुसार त्यांच्यात स्वातंत्र्यानंतरचा शहीद बिरसा मुंडा व बाबासाहेब आंबेडकर दोन्ही रूपाचा अंश होता.
स्वःताचे संपूर्ण आयुष्य निस्वार्थपणे आदिवासी समाजासाठी वाहून घेणारा नेता म्हणून ! एकच स्वप्न उराशी बाळगून जगला, तो म्हणजे आदिवासी समाजाला अन्यायमुक्त करून त्यांचा आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक व राजकीय विकास कसा करता येईल ?
एकच लक्ष्य आदिवासी, एकच धर्म आदिवासी ! सतत एकच विचार “माझ्या आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल ?”
कोणत्या अडचणी आहेत, ज्यामुळे माझा समाज विकासापासून वंचित आहे.त्यांचा
निरंतर अभ्यास, तत्कालिन आदिवासी नेत्यांच्या भेटीगाठी, सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा व सतत प्रवास, दौरे करून त्यांनी समाजाच्या वेदना जाणून घेतल्या.
एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला व त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली.
पहिला अडसर त्यांनी दूर केला क्षेत्रबंधनाचा !
त्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना किंवा दुसऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्या आदिवासींना गडचिरोली जिल्ह्यातून जाती प्रमाणपत्र मिळवावे लागत असे. याचा अर्थ दुसऱ्या जिल्ह्यातील आदिवांसींना आरक्षणाच्या कोणत्याच सुविधा मिळत नसतं.(राजकीय आरक्षण सोडून) हा आदिवासी समाजाच्या प्रगतीतील मोठा अडथळा होता.बाबुरावजींनी आपल्या सोबती आमदारांना ही बाब लक्षात आणुन दिली. दिल्ली गाठली, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. वेळ मिळेना ! शेवटी त्यांनी संसदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. 14 व्या दिवशी ही बाब इंदिराजी गांधी यांच्या कानी पोहचली.त्यांनी उपोषण स्थळी येऊन मागणी ऐकली व निंबूपाणी देऊन उपोषण सोडविले. क्षेत्रीय बंधनाचा कायदा केला.क्षेत्रीय बंधन कायद्यामुळेच आदिवासींना (S.T.) ओळख व फायदे मिळण्यास सुरवात झाली. याची तोड इतिहासात नाही. हे एक अतुलनीय कार्य आहे.
आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आदिवासींना आदिवासी (S.T.) म्हणून ओळख या समाजनिष्ठ कार्यकर्त्याने मिळवून दिली. आज सर्व क्षेत्रात विशेषत: शिक्षण श्रेत्रात याचा फायदा लाखो आदिवासी घेत आहेत.
बाबुरावजी मंत्री झालेत तेंव्हा त्यांचेकडे समाज कल्याण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अशी दोन खाती होती. त्यांच्या लक्षात आले कि, समाजकल्याण 90% निधि S.C. समाजाच्या योजनांवर खर्च करतो व फक्त 10% निधि आदिवासी योजनांवर खर्च करतो. हा अन्याय मडावीसाहेबांना असहनीय झाला. त्वरित त्यांनी आपला राजीनामा तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सादर केला. कारण विचारताच त्यांनी ही हकिकत बयान केली.वसंतदादांनी त्वरित कार्यवाही करून आदिवासी मंत्रालय निर्माण केले व बाबुरावजींनाच त्या खात्याचे राज्यमंत्री बनविले. आपल्या मंत्री पदाचा उपयोग करून त्यांनी आदिवासी कल्याण खात्याचे बजेट वेगळे करून घेतले.
राजकीय शक्तीच्या उपयोग समाजकार्यासाठी कसा करता येतो ? याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले.
गडचिरोली जिल्हा निर्मिती हे त्यांचे एक महान कार्य !
संपूर्ण चंद्पूरचे सर्व आमदार राजकीय वजनदार नेते विशेषत: तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार यांचा प्रखर विरोध पत्करून आपले राजकीय पद पणाला लावून त्यांनी गडचिरोली जिल्हा चंद्रपूर पासून वेगळा केला. चंद्रपूर जिल्हा असतांना एक बाब त्यांच्या लक्ष्यात आली. सर्वात जास्त राजस्व गडचिरोली जिल्हा राज्यशासनाला देते. परंतु विकास शुन्य ! ते या अन्यायाविरोधात खवळले.
19 दिवस पुन्हा संसदेसमोर उपोषण ! इंदिराजी बोलल्या, “ क्या आपको उपोषण करने सिवा दुसरा काम नही है क्या ?”
बाबुरावजी बोलले, मै आदिवासी समाज के हक और स्वाभिमान की लडाई लढ रहा हूँ, और कितनी बार उपोषण करना पड़ेगा मुझे मालूम नहीं । इसमे मेरी जान चलीं जाये, मुझे पर्वा नही । आख़री दमतक आदिवासी योंके अधिकार के लिये लढता रहूँगा !”
बोगस आदिवासींचा प्रश्नाविरूद्ध कोणी आमदार समोर आले नाही.तेंव्हा आम आदिवासी समाजाला सोबत घेऊन बाबुरावजींनी हा लढा उभारला. आदिवासी “आरक्षण संरक्षण समिती” स्थापन करून त्यांनी आदिवासी समाजातील सर्व उपजातींच्या जनतेला सोबत घेऊन जिल्हा-जिल्हयात, नागपूर अधिवेशनावर लाखोंचे मोर्चे काढले. त्याने प्रभाव पडला नाहीतर त्यांनी मुंबई अधिवेशनावर मोर्चा काढला. आजपर्यंत मुंबईत निघालेला तो आदिवासी समाजाचा पहिला व शेवटचा मोर्चा अशी नोंद आहे.
या बोगस आदिवासींच्या प्रश्नाने मडावीसाहेबांचा राजकीय बळी पडला.त्याकाळी बोगस आदिवासींनी श्रावण पराते व राम हेडाऊ यांचे मार्फत 1 कोटी रुपयाची लाच देऊ केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी “ बोगसांचा प्रश्न सोडा मी आपणांस मंत्री बनवितो” ही लालूच दिली. पण तो बाबुराव मडावी होता.त्यांनी समाजासाठी या प्रलोभनाला लाथेने तुडविले. ते सर्वोच्च न्यायालयात लढले,कोणी मंत्री, आमदारांनी आर्खिक मदत केली नाही. तरि ते डगमगले नाही. आमदार कोठ्यातील आपला वरळी येथील फ्लैट फक्त 35 लाख रूपयांत विकला. ज्यांचा आजची किंमत 20 कोटी आहे.व मिलिंद कटवारे विरूद्ध महाराष्ट्र शासन यांत स्वत:ला इंटरवेंटन करून घेतले. कारण सुप्रीम कोर्टात हरण्याचा कुटील डाव महाराष्ट्र शासनाने रचला होता. ही बाब बाबुरावजींच्या लक्षात आली होती. ते केस जिंकले, परंतु महाराष्ट्र शासनाने त्याला मान्य केलं नाही. तो निकाल सुशिक्षित वर्गाने अवश्य वाचावा. कारण त्यात मिलिंद कटवारे यांचे जीवन उध्वस्त होऊ नये, यासाठी त्याला व्यक्तिगत एकट्यास सुट देण्यात आली होती. परंतु बोगस आदिवासी समाजाने पैश्याच्या जोरावर त्या निकालाला लागू करू दिले नाही.तो सर्वांना लागू करू नका.ह्यासाठी राजकीय नेते व प्रशासनावर आर्थिक भडीमार केला.
आदिवासींच्या जमीनीवर बळजबरीने कब्जा करण्याचे प्रमाण वाढल्याने जमीन हस्तांतरण कायदा करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला. व कार्यान्वित केला.आदिवासी विद्यार्थी यांचे साठी आश्रमशाळा ही संकल्पना बाबुराव मडावी यांनी शासनासमोर ठेवली व अंमलात आणण्यास सरकारला भाग पाडले.
अ.भा.आदिवासी विकास परिषदेला महाराष्ट्रात रूजविण्याचे व भरभराटीस आणण्याचे कार्य व प्रत्येक गावात पोहचविण्याचे बहुमुल्य कार्य ही त्यांची सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.
ते जीवंत असे पर्यंत त्यांनी उपरोक्त संघटनेला एंल्पायमेन्ट ऐक्सचेंज चे अधिकार केंद्र सरकारकडून मिळवून दिले. महाराष्ट्रात 9 राष्ट्रीय अधिवेशने घेतली. पंतप्रधान नरसिंहाराव पासून अनेक केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक मुख्यमंत्री प्रामुख्याने हजर राहीलेत, कारण त्यांचा. सामाजिक दरारा लय भारी होता.
गरीबीत जन्मलेला हा समाजसेवक आजीवन सत्तेचे सुख भोगू शकला असता. परंतु आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी त्यांनी सत्तेला ठोकर मारली.
तो आदिवासी संपूर्ण समाजाचा सच्चा सेवक होता. पण काही समाजकंटक त्यांना परधान या उपजाती पुरतां सिमित करण्याचा घाणेरडा उठाठेव करित आहेत.
सुर्यप्रकाश, हवा , सुगंध ज्याप्रमाणे भेदभाव करित नाही. बाबुरावजी मडावी यांनी भेदभाव न करता समस्त आदिवासी समाजाला एका धाग्यात, एकसूत्रात बांधण्याचामरेपर्यंत प्रयास केलेला आहे.आज गडचिरोली पासून ते पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा, धुळे, नंदुरबार पर्यंत त्यांनी समाज कार्यकर्ते निर्माण केले.मुंबईत सांताक्रुज येथे आदिवासी कॅालनीसाठी 99 वर्ष लीज वर जागा मंजूर केली. नागपूरला राणी दुर्गावती नगर मधे आदिवासी कॅालनी वसविली. असे अनेक असंख्य कार्य त्यांनी आपल्या जीवनात केले. कोणताही कार्यकर्ता निराश होऊन जाऊ नये, याची ते प्रकर्षांने काळजी घेत असतं. “ कार्यकर्ता आहे तर माझे अस्तित्व आहे, त्यांच्याविना मी शून्य आहे” हे नेहमी सांगत होते.
आदिवासी समाजाचे तत्कालिन ऋण त्यांनी फेडले.परंतु आज अनेक प्रश्न समाजा समोर संकट बनून पुढे आहेत. हे ही सत्य आहे.