माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा चंद्रपूरमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ
दिनचर्या न्युज :
चंद्रपूर, १५ :
कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हि मोहीम राबविण्यात येत आहे. कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाचे शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथील वीस कलमी सभागृहात करण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोगेवार, राजुराचे आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुह्वाने, उपविभागीय अधिकारी ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी माधव गावळ यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वतःहून स्वतःची व स्वतः च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्याटप्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयीतांची कोविड १९ चाचणी करण्यात येणार आहे. कोविड १९ बाबत प्रत्येक नागरिकाला शिक्षित करणे तसेच संशयीत नागरिकांना त्वरित शोधणे व त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करणे जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल. हा यामागील उद्देश असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं .
या मोहिमेदरम्यान नागरिकांना कोवीड नियंत्रणासाठी शिकणे आजची गरज असून यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळताना अनावधानाने काही चुक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत. असे वडेट्टीवार म्हणाले. नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवावे, मुखपटी अर्थात फेसमास्कचा कटाक्षाने वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावे, तसेच निर्जंतुकीकरण द्राव्याचा योग्यरीत्या वापर करावा हि त्रिसुत्री प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर,, सोसायटी किंवा वसाहतीमध्ये, दुकाने, मंड्या, मॉल्स मध्ये खरेदीला जाताना, प्रवास करताना या सर्व बाबी जैवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे असे वडेट्टीवार म्हणाले .
जोवर कोविड विषाणूंवर प्रभावी लस सापडत नाही तोपर्यंत या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नाना सहकार्य करा असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
*************************************