24 तासात 76 बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571



चंद्रपूर जिल्ह्यातील 1037 बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी

Ø 24 तासात 76 बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571

Ø 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी व नोंद करण्यात येणार आहे. अशी माहिती व्हिडिओ संदेश जारी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 571 वर पोहोचली आहे. 24 तासात 76 बाधित पुढे आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 1037 बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर 516 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज (दि.25) सकाळी 8.05 वाजता पठाणपुरा वार्ड चंद्रपूर येथील 72 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्टला दुपारी 3.35 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधित पुरुषाला श्वसना संदर्भातील समस्या तसेच न्यूमोनिया आजार होता. बाधितावर शर्तीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, आज सकाळी 8.05 वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या 18 बाधितांची नोंद आहे. यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 16 बाधित तर तेलंगाणा व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

24 तासांत पुढे आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक 37 बाधित चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्याचबरोबर बल्लारपूर 19, चिमूर 2, वरोरा 5, मुल 6, कोरपना 5, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण 76 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहरातील तुकूम, पंचशील चौक, नगीनाबाग, दानववाडी, बाजार वार्ड, मित्र नगर, बाबूपेठ, जलनगर, उत्तम नगर, समाधी वार्ड, रयतवारी कॉलनी, जेबी नगर, गांधी चौक, अंचलेश्वर वार्ड, चोर खिडकी, खापरी वार्ड, नाना पेठ, जीएमसी परिसरातील तर तालुक्यातील घुग्घुस, दुर्गापूर, मोरवा येथील बाधित पुढे आले आहेत.

बल्लारपूर शहरातील गोकुळ नगर, झाकीर हुसेन वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, शिवनगर वार्ड, संतोषी वार्ड, गांधी वार्ड, श्रीराम वार्ड, किल्ला वार्ड, बिल्ड गुरूनानक वार्ड तर तालुक्यातील कोठारी येथील बाधित ठरले आहेत.

चिमूर येथील एक तर तालुक्यातील कोलारा येथून एक पॉझिटिव्ह ठरला आहे. वरोरा येथील कर्मवीर वार्ड, बंगाली कॉलनी, तिलक वार्ड तर तालुक्यातील वनोजा, आर्वी येथील बाधित पुढे आले आहेत.मूल तालुक्यातील चिंचाळा गावातून बाधित ठरले आहेत.

कोरपना तालुक्यातील वरसडी गावातून तर विरुर गडेगाव येथून बाधित पुढे आले आहेत. पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट्टा गावातील एक पॉझिटिव्ह ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील असणारा बाधिताचा अहवाल चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला आहे.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1571 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 32 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 128 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 880 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 407 बाधित, 61 वर्षावरील 94 बाधित आहेत. तसेच 1571 बाधितांपैकी 1055 पुरुष तर 516 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1571 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1 हजार 464 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 44 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

00000