पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 44 पैकी 24 नमुने निगेटीव्ह
*रुग्णाला विशेष तपासणी करीता नागपूरला हलविले*
Ø *रूग्णाच्या मुलाचाही अहवाल निगेटीव्ह*
Ø जिल्हयात फक्त एकच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह
Ø जिल्हयातील नागरिकांनी लॉकडाऊन पाळावा
Ø उदया बिहारच्या मजुरांना वर्धा व नागपूर वरून रवाना करणार
Ø बाहेर राज्यातून येणाऱ्या नाग
रिक होम कॉरेन्टाईन
चंद्रपूर दि. 5 मे : जिल्ह्यामध्ये फक्त एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे.या रुग्णाला कोविड शिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणी करीता सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील 44 नागरिकांचे स्वॅब नागपूरच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 24 नमुने निगेटीव्ह आहे.यामध्ये रुग्णाच्या मुलाचा अहवाल देखील निगेटीव्ह आहे.यापुर्वी पत्नी व मुलीचा देखील अहवाल निगेटीव्ह आला होता. जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती जैसे थे असून बाहेरून आलेल्या प्रत्येक कामगाराला, मजुराला 14 दिवसांसाठी होम कॉरेन्टाइन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी 9 वाजता विजयवाडा येथून आंध्र आणि तेलंगाना राज्यात अडकलेल्या 1 हजारावर मजुरांना चंद्रपूर येथे विशेष ट्रेनने आणण्यात आले. या सर्व मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यात आले असून त्यांना होम कॉरन्टाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकच पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आहे. या रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व हा रुग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील यापुर्वीच पाठविण्यात आलेल्या एकत्रित 44 पैकी 24 नागरीकांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आहे. यामध्येच रुग्णाच्या मुलाचा देखील अहवाल निगेटीव्ह आहे. अन्य 7 अहवाल यापुर्वीच निगेटिव्ह आले असून यामध्ये 2 अहवाल हे रुग्णाच्या पत्नी व मुलीचे आहे.दरम्यान,आज आणखी परीसरातील चौकशीमध्ये रुग्णाच्या संपर्कातील आतापर्यंतच्या 71 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे
दरम्यान, बिहार येथील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी उद्या वर्धा आणि नागपूर या ठिकाणावरून 2 वेगवेगळ्या रेल्वे गाड्या सुटणार आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणच्या रेल्वे साठी 15 ही तालुक्यातील मजुरांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या त्यांना वर्धा व नागपूर येथे हे संबंधित रेल्वे गाड्यांवर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची वाहन व्यवस्था करण्यात येत आहे
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज लॉकडाऊन संदर्भात बोलताना या पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंशिवाय कोणतीही दुकाने उघडली जाऊ नये, असे पुन्हा स्पष्ट केले. याशिवाय सोशल माध्यमांवर विनाकारण अफवा पसरविणाऱ्यावर, समाजजीवन ढवळून काढणाऱ्या चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे.