संकट मोठे ;मात्र घरातच राहणे
हाच उपचार : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार
Ø संचारबंदी भंग करणाऱ्या 21 वर पोलिस विभागाची कारवाई
Ø एकही रुग्ण जिल्ह्यात पॉझिटिव्ह नाही
Ø विदेशातून परत आलेल्या 45 नागरिक निगराणीत
Ø गरज पडल्यास सर्व हॉटेल ताब्यात घेणार
Ø निराश्रितांसाठी मनपा कम्युनिटी किचन राबविणार
Ø उद्यापासून पोलिस आणखी कडक संचारबंदी करणार
Ø 14 एप्रिल पर्यंत नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याची प्रशासनाची तयारी
चंद्रपूर, दिनचर्या न्युज :-
जगभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतातही ही संख्या वाढत आहे. वैद्यकीय सूत्रानुसार यावर केवळ अलिप्त राहणे,घरात राहणे हाच इलाज असून त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी संचार बंदीच्या संपूर्ण काळात घरीच राहावे, प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी संपूर्ण देशात 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी जारी केली आहे. हा निर्णय देश हितार्थ आहे. या काळामध्ये नागरिकांना मूलभूत प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. आज सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, पाणी पुरवठा तसेच आवश्यक आरोग्य सुविधा या परिस्थितीत जनतेला कशा पद्धतीने उपलब्ध करावी, यासंदर्भात चर्चा केली. चंद्रपूर महानगरपालिकेने निराश्रीत, गरीब व ज्यांच्याकडे रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा सर्व नागरिकांसाठी महानगरपालिका हद्दीत कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र हे भोजन त्यांना पार्सल स्वरूपात अर्थात घरी घेऊन जाण्यासाठी मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेने 07172-254014 टेलिफोन सेवा उपलब्ध केली आहे.
शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थित राहावा, वीज पुरवठा नियमित स्वरूपात राहावा, यासाठी निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांना घरी थांबण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहे. कोरोना हा आजार केवळ अलगीकरण प्रक्रियेतूनच नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीताघरीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील 14 एप्रिल पर्यंत जिल्ह्यामध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेतच खरेदी करता येणार आहे. मात्र यासाठी झुंबड उडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक साठा उपलब्ध असून गरजेनुसार तो आणखी प्रमाणात उपलब्ध केल्या जाईल. तसेच भाजीपाला ,दूध आदी जीवनावश्यक वस्तू नियमित स्वरूपात मिळाव्या यासाठी प्रशासन कार्यरत असून कोणत्याही वस्तूचा तुटवडा पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या दुकानांमधून केवळ आवश्यकतेनुसार खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून 3महिन्यांचे रेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान,संचारबंदी या आजाराशी संबंधित उपचार आहे.मात्र काही बेजबाबदार प्रवृत्ती अशा वेळी रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून येत आहे. एकमेकांचा संपर्क हा यातील सर्वात मोठा धोका असून त्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. अशा काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला असून उद्या पोलीस या संदर्भात आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉक डाऊन म्हणजे तो जिथे असेल त्याने तिथे थांबणे. असे देशभर अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बाहेर राज्यातील नागरिक, अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक मजूर ,कामगार,या काळामध्ये अडकून पडले आहेत. मात्र इतर जिल्ह्यातही चंद्रपूरच्या अनेक नागरिक अडकून पडले आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रशासन अशा नागरिकांची काळजी घेत असून हेल्पलाइन संदर्भात प्रशासनाने जाहीर केलेल्या दूरध्वनीचा या काळात वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान,जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये सध्या बाहेर देशातून आलेल्या 45 नागरिकांना निगराणी ठेवण्यात आले आहे. जवळपास 49 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले होते. त्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आज केवळ एका नागरिकाला होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. लंडन वरून आलेल्या कुटुंबाचा अहवाल यायचा बाकी आहे.जिल्ह्यात आज रोजी एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.