कोरोणा विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाची खबरदारी
शासकीय-निमशासकीय शाळा 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश
Ø चंद्रपूर मधील सिनेमागृह, नाट्यगृहांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश
Ø जिल्हयात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, आरोग्य यंत्रणा सज्ज
Ø दुबईवरून आलेले चंद्रपुरातील दोन्ही नागरिक निगेटिव, प्रकृती धोक्याबाहेर
Ø शासकीय कार्यालयातील प्रत्येक टेबल नीटनेटका ठेवण्याचे निर्देश
Ø चंद्रपूरमध्ये आयएमए संघटनेने सर्वतोपरी मदतीची घोषणा
Ø आवश्यकतेनुसार प्रवास व सार्वजनिक ठिकाणी जाण्याच्या सूचना
चंद्रपूर, दि. 14 मार्च : राज्यशासनाने साथरोग कायदा लागू केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता 31 तारखेपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अनेक लोक एकत्रित येतील अशा चित्रपटगृह, नाट्यगृह, व्यायाम शाळा, जलतरण तलावाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान चंद्रपूरमध्ये आतापर्यंत विदेशातून आलेल्या 10 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामधील दुबईवरून आलेले दोन नागरिक देखील निगेटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप कोणत्याही कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद नाही. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
राज्य शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्ह्यांमध्ये लागू केला आहे. प्रशासनाने या अनुषंगाने आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून यामध्ये जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय देखील आहे. सोबतच ज्या ठिकाणी अनेक लोक एकत्रित येतात अशा सार्वजनिक उपक्रमांना देखील मज्जाव केला आहे. त्यामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढील निर्देश देण्यात आले आहे.
शाळा, कॉलेज, आंगणवाडया बंद करण्याचे निर्देश
राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जाहीर केलेल्या निर्देशानुसार सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व्यवसाय प्रशिक्षण केंद्र त्यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित केले आहे. तथापि दहावी व बारावीच्या परीक्षा लक्षात घेता त्या विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असे निर्देश दिले आहे. आजारी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना देखील संबंधित संस्था प्रमुखांना देण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयात स्वच्छता राखा
शनिवारी सर्व विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले गेले प्रत्येकाने विलगीकरणाची प्रक्रीया राबवावी, हात स्वच्छ राहील यासाठी आवश्यक साबण व पाण्याची उपलब्धता कार्यालयांमध्ये असेल याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
सिनेमा, नाटयगृहे, व्यायमशाळा, तरणतलाव बंद
शनिवारी सायंकाळी आज रात्री 12 नंतर उद्यापासून अनिश्चित काळापर्यंत शहरातील सर्व मल्टिप्लेक्स सिनेमागृह व्यायाम शाळा पोहन तलाव प्रेक्षागृह नाट्यगृहाच्या मालकांना व्यवस्थापकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर योग्य त्या बाबी आढळून आल्यास आस्थापनांना पुढील काळासाठी सिनेमागृहे प्रेक्षक नाट्यगृह बंद करण्याचा देखील निर्णय जिल्हा प्रशासन घेऊ शकते असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय यंत्रणा सज्ज
जिल्ह्यामध्ये या विषाणूचा फैलाव होणार नाही. यासाठी विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर लक्ष देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 10 विदेशी नागरिकांना तपासण्यात आले आहे कोणीही पॉझिटिव्ह नाही तथापि त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता एस एम मोरे यासंदर्भात दक्ष असून जिल्हा प्रशासनाला नियमित माहिती देत आहे यासंदर्भातील राज्यस्तरीय कक्षामध्ये दर दोन तासांनी याबाबतची माहिती दिली जात आहे.
महाकाली यात्रा स्थगित
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राचीन महाकाली मातेच्या गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात सुरू होणाऱ्या यात्रेला देखील स्थगित करण्यात आले आहे. यासंदर्भात तेलंगाना व मराठवाडा भागातील सर्व जिल्ह्यांना अवगत करण्यात आले आहे. महाकाली मंदिराचे ट्रस्टी, आयोजन समिती मधले अन्य सदस्य व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये जगभरात काळजी घेतली जात असून या उत्सवातून कोणत्याही भक्ताचे नुकसान होणार नाही, याची काळजी सर्वांची असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयएमए संघटना सक्रीय
इंडियन मेडिकल असोसिएशनची या संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. शहरांमधील सर्व खाजगी इस्पितळाच्या आस्थापनांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या संपर्कात असून दररोज शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये करोना विषाणू संदर्भात आलेल्या या रुग्णा बाबतची माहिती शासनाला दिली जात आहे.
तालुका स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती
जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणखी एक निर्णय काढतांना तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीची तात्काळ बैठक बोलविण्यात बाबतचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय कृती आराखडा बनविण्यात यावा, अशा पद्धतीचे निर्देश यामध्ये देण्यात आले आहे.
सर्व विश्रामगृह कोरोन्टाईन स्थळे
यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे याठिकाणी 14 मार्च पासून कोरोन्टाईन ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विश्रामगृहातील कक्षा आरक्षित करण्यात आले असल्यास ते रद्द करण्यात यावे व इतर कोणालाही पुढील आदेश होईपर्यंत देण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक उपक्रम रद्द करण्याचे निर्देश
राज्य शासनाने राज्यामध्ये साथरोग प्रतिबंधक मग कायदा 897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे आज काढलेल्या विविध आदेशामध्ये राज्यात सामाजिक सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकमंत्री घेणार सोमवारी आढावा
दरम्यान, या सर्व उपाययोजनांच्या परिस्थितीमध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सोमवारी 11 वाजता नियोजन भवनामध्ये जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा घेणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता केवळ प्रतिबंधात्मक उपाय योजना घराघरात राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.