अन् नववधूने ‘त्या’ तरुणांना दिले स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांचे ‘रिटर्न गिफ्ट’



चंद्रपूर - विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभाशिर्वाद म्हणून भेट देण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. विवाह सोहळ्याला उपस्थित मंडळींनी रोकड स्वरुपात दिलेली सस्नेह भेट नववधूने स्वत:कडे न ठेवता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिली. बुधवारी चंद्रपूरात पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यात नववधूने समाजापुढे ठेवलेला नवा आदर्श कौतुकाचा विषय ठरला आहे.

चंद्रपूर येथील क्लब ग्राऊंडवर किशोर जोरगेवार यांची कन्या कामिनी हिचा अकलूज-पंढरपूर येथील सूर्यवंशी कुटुंबातील श्रीओंकार या तरुणाशी हिंदू पद्धतीने पार पडला. या विवाह सोहळ्यात वधू-वरांना सहजीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आप्तस्वकीयांसह मोठ्या संख्येने विविधस्तरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती. लग्न लागल्यानंतर उपस्थित मंडळींना वधू-वरांना शुभाशिर्वादाच्या रुपात आपल्यापरीने रोख स्वरुपात सस्नेह भेट दिली. ही रक्कम वधू कामिनीने स्वत:जवळ न ठेवता शुभेच्छा देण्यासाठी २५ हजारांची स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तके डॉ. जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळाच्या जटपुरा गेट येथील शाखेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. लगेच पुस्तकांची उपलब्धता करण्यात आली. यानंतर विवाह मंडपातच नववधू कामिनीने स्पर्धा परीक्षेला आवश्यक असलेली पुस्तके ‘रिटर्न गिफ्ट’ च्या स्वरुपात दिली. नववधूने दाखविलेले हे सामाजिक दायित्व कौतुकाचा विषय ठरले आहे.