नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृत केले जात असून यावर्षी अशा १८ मानकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वि.सा. संघाच्या वर्धापन दिन समारंभात ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतिने देण्यात आली आहे.
येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी वि.सा. संघाचा ९६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्या समारंभात हे पुरस्कार मान्यवरांना देण्यात येतील. यामध्ये ज्येष्ठ लेखिका सुप्रिया अय्यर यांना पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, श्रीपाद कोठे यांना मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार, डॉ. शिरीष देशपांडे यांना अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र लेखन पुरस्कार, डॉ. अमृता इंदुरकर यांना कुसुमानिल स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार, इरफान शेख यांना सर्वोत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार, वसंत बाहोकर यांना वा.कृ. चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार, डॉ. विजया फडणीस यांना य.खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार, डॉ. संजय नाथे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती लेखन पुरस्कार, गंगाधर ढोबळे यांना संत गाडगेबाबा स्मृती लेखन पुरस्कार, डॉ. प्रमोद गारोडे यांना मा.गो. देशमुख स्मृती संत साहित्य पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय अविनाश पोईनकर व संघमित्रा खंडारे यांना नवोदित लेखन पुरस्कार, डॉ. हृषिकेश गुप्ते, बरखा माथुर, दा.गो. काळे, डॉ. प्रवीण महाजन, प्रमोद वडनेरकर यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार घोषित करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष पारितोषिक यावर्षी देण्यात येणार असून छायाचित्रकार शेखर सोनी यांना हा पुरस्कार देण्यात येईल.