चालकांनी झिरो अपघाताचे तत्त्व पाळावे:पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

चंद्रपूर/प्रतीनिधी:

 रस्त्यांवरून मनमानी पद्धतीने वाहने नेताना अनेक अपघात होतात. यामध्ये मानवी चुका कारणीभूत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी खासगी वाहतुकधारकांनी झिरो अपघाताचे तत्त्व पाळावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस मुख्यालयातील ड्रील शेडमध्ये शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व खासगी वाहतुकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मनपा आयुक्त संजय काकडे, राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. एन. शिंदे, व जिल्ह्यातील वाहतुक शाखेचे सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
वाढत्या वाहतुकीच्या साधनांमुळे दळणवळणाचा वेग वाढला. वाहतुक नियमांच्या पायमल्लीमुळे कोंडी होत आहे. प्रदूषण व अपघाताच्याही समस्या वाढल्या. खासगी वाहतुकदारांनी कर्तव्य व सेवेची जाणीव ठेवून कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, याकरिता ‘रोड सेफ्टी-झिरो अ‍ॅक्सिडेंट’ हा उद्देश ठेवून सदर बैठक घेण्यात आली. नियमांचे पालन करून वाहतुकदार रोड सेफ्टी-झिरो अ‍ॅक्सिडेंट हा उद्देश कसा साध्य करू शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकदारांनी वाहतुकसंबंधी नियमांचे पालन केल्यास अपघातामुळे जाणारे जीव वाचविण्यास मदत होऊ शकते. वाहतुकदारांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. ओव्हरसिट तथा ओव्हरलोड करून वाहतुक करणे, हे अपघातास निमंत्रण देणारे ठरू शकते. यासंबंधीही जाणीव करून देण्यात आली. वाहनांवर नियुक्त केलेल्या व नव्याने नियुक्त करत असलेल्या चालकांचे चारित्र्य पडताळणी व आरोग्य तपासणी करूनच नियुक्त्या कराव्यात, याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व वाहनांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावून पार्किंग लाईट व हॉर्न सुव्यवस्थित स्वरूपात ठेवण्याबाबत सांगण्यात आले. बैठकीला आॅटो चालक, आॅटो युनियनचे अध्यक्ष, टॅक्सी चालक, ट्रक मालक, प्रवासी वाहतुकदार व ट्रॅव्हल्स मालक उपस्थित होते.