नागपुरातील दोन लाख झोपडपट्टीवासीयांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपुरातील दोन लाख झोपडपट्टीवासीयांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पट्टेवाटप : ‘मिशन मोड’वर काम करण्याचे निर्देश


नागपूर, ता. १६ : समानतेच्या सूत्रानुसार मालकी हक्काचे घर हा प्रत्येक गरीब व्यक्तीचा अधिकार आहे. ज्यांनी अतिक्रमण केले ती त्यांची मजबुरी होती. तेच अतिक्रमित घर आता शासन निर्णयानुसार मालकी हक्काचे होत आहे. नागपूर शहरातील सुमारे दोन लाख झोपडपट्टीवासीयांना शासन निर्णयाचा फायदा होत असून हे पट्टे तातडीने वाटप करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टेवाटप व निर्वासितांना दिलेल्या मिळकतीचा सत्ताप्रकार अ-१ करून सुधारीत आखीव पत्रिकांचे वितरण आज (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होती. मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नगरसेवक लखन येरावार, विजय चुटेले, नगरसेविका लता काटगाये, रमेश भंडारी, राजीव हडप उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्या गरीबांनी शासकीय जमिनीवर घर बांधले ते घर त्याच्या हक्काचे व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. आम्ही सत्तेत येताच त्याचा पाठपुरावा सुरू केला. मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी गेल्या अडीच वर्षात नियम आणि कायद्यात बदल केले. या मार्गातील सर्व अडचणी दूर करून अखेर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन आदेश काढलेत. या आदेशानुसार आता सन २०११ पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होत आहे. नागपुरात आतापर्यंत २५ हजार झोपडपट्टीधारकांच्या पट्ट्यांचे आणि रजिस्ट्रीचे कार्य पूर्ण झाले आहे. नागपुरातील दोन लाख झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहे. नियमित रजिस्ट्री कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात रजिस्ट्री करणे शक्य नाही. त्यामुळे नागपुरात स्वतंत्र निबंधक कार्यालय तयार करण्यात आले असून येथे केवळ झोपडपट्टीधारकांच्या रजिस्ट्री होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विशेष म्हणजे नियमित रजिस्ट्री ज्या पद्धतीने होते, त्यात ज्या नियम व अटी आहेत तशीच रजिस्ट्री होणार आहे. आणि प्रत्येक पट्ट्यात घरातील स्त्रीचे नाव असावे, हा नियम या पट्टेवाटपासाठी असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकातून मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मालकी हक्क पट्टे वाटपाची पार्श्वभूमी सांगितली. याआधी केवळ आश्वासने मिळाली. कृती कोणी केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कामगार कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप केले. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी झोपडपट्टीधारकांच्या हिताचा निर्णय घेत कृती केली आणि दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले. संचालन नगरसेवक प्रमोद चिखले यांनी केले. कार्यक्रमाला मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त स्मिता काळे, सुवर्णा दखने उपस्थित होते.

झुडपी जंगलावरील अतिक्रमणही होणार नियमित

नागपुरात झुडपी जंगलाच्या जागेवर आणि खासगी जागांवरही अतिक्रमण आहे. झुडपी जंगलसंदर्भात केंद्रीय मंत्रालयात आपण पाठपुरावा केला. केंद्र सरकारने यावर निर्णय घेतला आहे. देशात पहिल्यांदा असा निर्णय झाला असून ही बाब नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र शासन दावा दाखल करीत आहे. ही प्रक्रिया झाल्यावर झुडपी जंगल जागेवरील अतिक्रमण नियमित होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. खासगी जागेवरील अतिक्रमणासंदर्भातही शासन धोरण निश्चित करीत आहे. नासुप्रच्या जागेवरील मात्र रेल्वेच्या आडकाठीमुळे ज्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न रेंगाळला आहे, त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच संबंधित झोपडपट्टीवासीयांनाही मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मागील ७० वर्षांपासून मालकी हक्कासाठी झटत असलेल्या सिंधी बांधवांसाठीही त्यांच्या फायद्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

नागपूरकरांमुळे राज्यातील झोपडपट्टीवासीयांना लाभ

मालकी हक्काचे पट्टे मिळावे, ही मागणी नागपुरातून सुरू झाली. आपण स्वत: विरोधी पक्षात असताना त्याचा पाठपुरावा केला. कायदेशीर लढाई लढली. जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो. यानंतर ह्या प्रश्नांवर सातत्याने कार्य केले आणि निर्णय घेतला. नागपूरकरांनी मला निवडून दिले नसते तर कदाचित हे शक्य झाले नसते. अर्थातच नागपूरकरांमुळे राज्यातील झोपडपट्टीवासीयांना शासन निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने सांगितले.

जनतेने दिलेल्या संधीमुळेच मालकी हक्काचा निर्णय शक्य : गडकरी

मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी गेल्या २५ वर्षांपासून आहे. यापूर्वी अनेक घोषणा झाल्यात. मात्र, निर्णय झाला नाही आणि अंमलबजावणीही नाही. गरिबांबद्दलच्या संवेदनशीलतेतून महाराष्ट्र शासनाने घेतला निर्णय अनेक अतिक्रमितांना दिलासा देणारा आहे. त्याचे स्वागत झालेच पाहिजे. जनतेने आम्हाला निवडून दिले नसते तर कदाचित हा निर्णय घेणे शक्य झाले नसते. जनतेने दिलेल्या संधीमुळेच हे शक्य झाले. नागपूरचा खासदार म्हणून आपण महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात जी ६६ हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत, त्याचेही श्रेय मायबाप जनतेलाच जाते, असा गौरवोल्लेख त्यांनी केला.

लाभार्थ्यांना पट्टेवाटप

कार्यक्रमात सरस्वती नगर, फकीरवाडी, रामबाग, जाटतरोडी, कुंदनलाल गुप्ता वाचनालयाच्या मागील वस्ती,बोरकर नगर, बसोड मोहल्ला झोपडपट्टी, काफला वस्ती, इमामवाडा-२ या झोपडपट्टीवासीयांना प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. रामबाग झोपडपट्टीतील रहिवासी मायाबाई विठ्ठलराव उईके, माला विक्रम लोखंडे, निर्मला चिंतामण थूल, हरिश्चंद्र नामदेव लोखंडे, तुळसाबाई शेषराव बडवाईक, बोरकर नगर/बसोद मोहल्ला झोपडपट्टीतील शांताबाई नाहारकर, छोटीबाई रमेश मनहरे, बब्बू जग्गू सिकलवार, अंगत बिंदा बसेल/काशीनाथ बिंदा बसेल, मन्ना सुदर्शन सकतेल, सरस्वती नगर/फकीरावाडी झोपडपट्टीतील बुधाजी झिमनजी सूरकार, अनुसया मनोहर बावणे, दीपक लोखंडे, गौतम उत्तमराव तायवाडे, दिलीप पूरन ताकतोडे, विजयकुमार कन्हैय्यालाल गुप्ता, विजय रामदास कांबळे, आशाबाई सुंदरसिंग ठाकूर, सुनिता बुधारू शाहू, इसराईल अब्दुल सरिक खान, इमामवाडा-२ येथील दुर्योधन रघुनाथ चव्हाण, चंद्रमोहन हुकुमचंद यादव, जियाजी भीमराव जगदीश, ललिता तुकाराम मेश्राम, शांताबाई बाबूलाल मनपिया यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पट्टेवाटप करण्यात आले. अन्य लाभार्थ्यांना सोमवार १७ डिसेंबरपासून झोन कार्यालयात पट्टेवाटप होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.