तळोधी बा. ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा गैरव्यवहार


चंद्रपूर : अस्तित्वातच नाही अशा व्यक्तीच्या नावावर मजुरी उचलून तळोधी ग्रामपंचायतच्या सरपंचाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तळोधी ग्रामपंचायतचे माजी सदस्य अजय भागवतवार आणि अनिल माथनकर यांनी शुक्रवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केला. .

तळोधी बा. ग्रामपंचायत ही नागभीड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. राजू रामटेके हे गावाचे सरपंच आहे. अलीकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंच राजू रामटेके याना लाच घेताना अटक केली आहे. रामटेके यांनी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे. गावात अवैध फेरफारची कामे केली जात आहे. यासाठी रामटेके मोठ्या रकमा घेऊन फेरफार करून देत आहे. तर एकाच कुटुंबातील दोन सदस्याना घरकुलाचा लाभ घेता येत नसतानाही रामटेके यांच्या आईच्या नावाने आणि स्वत: सरपंच राजू रामटेके यांच्या नावाने घरकुल मंजूर झाल्याने भागवतकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरपंच रामटेके हे भेदभाव करीत असून, समर्थकाची कामे तातडीने करतात तर विरोधकांची मात्र अडवणूक करीत असल्याचा आरोप भागवतवार यांनी चंद्रपूर येथील पत्रपरिषदेत केला. ग्रामपंचायतमधील रेाजंदारी कर्मचारी लिखिता रामटेके आणि मारोती यंेचलवार हे गैरहजर असतानाही त्यांचे वेतन काढले जाते. काही व्यक्ती गावात अस्तित्वात नाही, मात्र त्यांच्या नावाने सरपंच रामटेके यांनी मजुरी काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तेरावा वित्त आयोग, चौदावा वित्त आयोग, नागरी सुविधा, दलित वस्ती विकास, नरेगा, स्वच्छ भारत अभियानाच्या निधीत सरपंच रामटेके यांनी घोळ केला असून, १३ सप्टेंबर २०१५ पासून ग्रामपंचायतला मिळालेल्या निधीची चौकशीची मागणी भागवतवार यांनी केला आहे..