छत्रपती चिडे यांच्या परिवाराला 10 लाखाचा धनादेश सुपूर्द




मुख्यमंत्री सहायता निधी

चंद्रपूर दि 23 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनातर्फे नागभिडचे ठाणेदार दिवंगत पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखाचा धनादेश काल दि. 22 नोहेंबर रोजी देण्यात आला.

राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून काल गुरुवारी रात्री महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेशकुमार रेड्डी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुहास अलमस्त, आदींच्या उपस्थितीत चिडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून हा धनादेश देण्यात आला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे यापूर्वीच कुटुंबीयांची भेट घेऊन जाहीर केले आहे. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत राज्य शासनातर्फे चिडे यांचा निवास असणाऱ्या तुकूम येथील शिवनगर अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन ही मदत करण्यात आली. महापौर अंजलीताई घोटेकर व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरनार यांनी सन्मानपूर्वक हा धनादेश चेक मधुरीताई छत्रपती चिडे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी अमिन शेख, राजू गोलिवार, संजय कन्नावार, संजय मुसळे, शीला चव्हाण, गणेश कुळसंगे, प्रदीप गडेवार ,पुरुषोत्तम सहारे आदी उपस्थित होते.